बंगळुरू : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावाला सुरुवात केली. त्याने नेटमध्ये सात षटके गोलंदाजीही केली. मात्र, तो पाठीच्या दुखापतीतून बरा होऊन मैदानावर कधी पुनरागमन करेल, याचे उत्तर कुणाकडेही नाही.
विश्वचषकात बुमराह खेळावा, अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असली, तरी मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या शस्त्रक्रितेनंतर तो किती तंदुरुस्त झाला, याचे आकलन लवकरच होईल. त्याने सप्टेंबर २०२२ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्थानिक मैदानावर अखेरचा टी-२० सामना खेळला होता. तथापि, आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० सामन्यात किंवा आशिया चषकात खेळू शकेल का, याचा वेध घेणे कठीण होत आहे.
बुमराहच्या दुखापतींवर नजर ठेवणाऱ्या सूत्रांचे मत असे की, अशा प्रकारच्या दुखापतीतून सावरण्यासाठी वेळमर्यादा ठरविणे योग्य नाही. खेळाडूंवर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे असते. बुमराह चांगला प्रतिसाद देत आहे, असे आपण म्हणू शकतो. त्याने सात षटके गोलंदाजी केली. हळूहळू वेग आणि षटके वाढवू शकतो. शिवाय, शारीरिक व्यायामदेखील करू शकतो. पुढच्या महिन्यात एनसीएत काही सराव सामने खेळल्यानंतर त्याच्या फिटनेसचा अंदाज येईल.
भारतीय संघाचे माजी ‘स्ट्रेंग्थ आणि कंडिशनिंग’ कोच रामजी श्रीनिवासन म्हणाले, ‘बुमराहच्या पुनरागमनाबाबत सावध असावे. कुठल्याही प्रकारची घाई करू नये. एनसीएत सामना खेळणे एक पाऊल असेल. त्यामुळे सामन्यासाठी सज्ज होणे सोपे होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्याआधी काही सराव सामने खेळविणे गरजेचे आहे.’
राहुल, श्रेयस प्रगतिपथावरलोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर हेदेखील एनसीएत पुनर्वसन करीत आहेत. दोन्ही खेळाडू दुखापतीवर मात करण्यात यशस्वी झाले. सरावात त्यांची उत्तम प्रगती पाहायला मिळते. पण, दोघांच्या पुनरागमनाची वेळ निश्चित झालेली नाही. राहुलच्या जांघेवर लंडनमध्ये आणि श्रेयसच्या पाठीच्या खालच्या भागात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.