jasprit bumrah latest news : भारतीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीचा प्रमुख चेहरा म्हणजे जसप्रीत बुमराह. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये बुमराहची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. कमी धावांचा बचाव करण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने वेळोवेळी बुमराहचा वापर केला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत 'बूम बूम'ने धावगतीला ब्रेक लावण्याचे मोठे काम केले. बुमराहच्या घातक माऱ्यामुळे इतर भारतीय गोलंदाजांना मदत मिळत असे. याचाच फायदा घेत अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे, पण या मालिकेतून बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
खेळापासून दूर असलेला बुमराह प्रसिद्धीच्या झोतात मात्र कायम असतो. आता तो त्याने केलेल्या एका विधानामुळे चांगलाच चर्चेत आहे. वेगवान गोलंदाज चांगल्या प्रकारे कर्णधारपद सांभाळू शकतो कारण त्यांना खेळ अधिक चांगला समजतो, असे बुमराहने सांगितले. वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जसप्रीत बुमराहने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तो म्हणाला की, विराट कोहली आज कर्णधार नसला तरी तो आजही संघाचे नेतृत्व करत आहे. मला वाटते की, कर्णधारपद ही केवळ एक पोस्ट आहे. पण, संघाचे नेतृत्व हा लीडरच करत असतो.
बुमराहचे भारी उत्तर
भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण? या प्रश्नावर व्यक्त होताना बुमराहने मिश्किलपणे म्हटले की, मी काही सामन्यांमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळले आहे, त्यामुळे मी स्वत:ला महान कर्णधार समजतो. रोहित शर्मा एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याने युवा खेळाडूंना संघात ज्युनियर आणि सीनियर कोणीही नसल्याचा अनुभव दिला. त्यामुळे सर्वांना चांगले वाटते. एखादा नवीन खेळाडू असला तरी त्याला नवखा असल्याची जाणीव होत नाही. संघातील प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा घटक असून, रोहित कोणालाचा लहान आणि मोठा असे समजत नाही, असेही बुमराहने सांगितले.