Jasprit Bumrah Sanjana Ganesan blessed with baby boy : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. बुमराहची पत्नी संजना गणेसन हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. रविवारी बुमराह आशिया चषक २०२३ मधून ब्रेक घेऊन वैयक्तिक कारणासाठी मुंबईत आला होता. आज सकाळी बुमराहच्या पत्नीनं मुलाला जन्म दिला आहे. बुमराहची पत्नी संजना गणेसन हिने गोंडस मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव अंगद असं ठेवण्यात आलं आहे.
बुमराहनं बाळाच्या हाताचा फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली. त्यानं सोशल मीडियावर बाळाच्या हाताची झलक शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली. "आमचं छोटं कुटुंब मोठं झालं आहे आणि आम्हाला कल्पनेपेक्षा जास्त आनंद होत आहे. आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचं, अंगद जसप्रीत बुमराहचं जगात स्वागत केलं. आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या जीवनातील या नवीन अध्यायाची सुरूवात करत आहोत", अशा आशयाचं कॅप्शन बुमराहनं दिलं. 'बाप'माणूस जसप्रीत बुमराहचं क्रिकेटच्या देवानंही अभिनंदन केलं आहे.
सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर खास चारोळ्या लिहित बुमराहच्या आनंदात भर घातली. सचिननं म्हटलं, "तुमच्या कुटुंबात नवीन सदस्य आल्याबद्दल तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन. लहान अंगदला खूप सारं प्रेम, आनंद आणि अगणित सुंदर खेळींनी भरलेल्या आयुष्याच्या शुभेच्छा. युवा चॅम्पचं या जगात स्वागत आहे."
कोण आहे बुमराहची पत्नी संजना गणेसन?जसप्रीतच्या मुंबईत परतण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. त्याच्या घरी गोड बातमी येणार असल्याने तो मुंबईत परतला. जसप्रीत १५ मार्च २०२१ ला स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेसन हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला. संजना गणेसन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरिंग केले आहे. संजनाने २०१९च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. सिम्बॉससिस इंस्टीट्यूटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं. त्यात तिने गोल्ड मेडल पटकावलं. त्यानंतर २०१३-१४मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केलं.