भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठित विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक २०२५ मध्ये जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा सन्मान देण्यात आला. तर, सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूचा मान निकोलस पूरनला मिळाला.
जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी २० पेक्षा कमी सरासरीने २०० विकेट्स घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो इतिहासातील पहिला कसोटी गोलंदाज ठरला. यामुळेच विस्डेनचे संपादक लॉरेन्स बूथ यांनी जसप्रीत बुमराहचे 'स्टार ऑफ द इयर' म्हणून उल्लेख केला. बुमराहने १५ पेक्षा कमी सरासरीने ७१ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. जूनमध्ये कॅरिबियनमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात भारताच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराहने एकट्याने १३.०६ च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्या. बूथने यांनी जसप्रीत बुमराहला सर्वात घातक गोलंदाज म्हटले आहे. याशिवाय, तो जगातील महान खेळाडूंपैकी एक असल्याचाही त्यांनी दावा केला.
स्मृती मानधना हिला विस्डेनने जगातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून घोषित केले. मानधनाने २०२४ मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये एकूण १ हजार ६५९ धावा केल्या, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात महिला खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यात चार एकदिवसीय शतकांचाही समावेश आहे, जो आणखी एक विक्रम आहे. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी२० सामन्यात भारताने दहा विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात मानधनाने तिचे दुसरे कसोटी शतक (१४९ धावा) झळकावले.
सरे काउंटीतील तीन खेळाडू गस अॅटकिन्सन, जेमी स्मिथ आणि डॅन वॉरल यांचा विस्डेनच्या वर्षातील पाच क्रिकेटपटूंमध्ये समावेश करण्यात आला. याशिवाय, हॅम्पशायरच्या लियाम डॉसन आणि इंग्लंडची खेळाडू सोफी एक्लेस्टोन यांनाही हा प्रतिष्ठित सन्मान देण्यात आला. भारताविरुद्ध पुणे कसोटीत न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने घेतलेल्या १३ विकेट्समुळे किवी संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. दरम्यान, २०१२ नंतर भारताने पहिलीच घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली. या कामगिरीसाठी सँटनरला विस्डेन ट्रॉफी देण्यात आली.
Web Title: Jasprit Bumrah, Smriti Mandhana named as Wisden's Leading Cricketers in the World
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.