Jasprit Bumrah, IPL 2022 MI vs KKR Video: मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात कोलकाताने संघात पाच बदल केले. दोनही सलामीवीरांना बदलून जुने-जाणते सलामीवीर मैदानात उतरवले. वरच्या फळीतील दमदार फलंदाजीमुळे १३व्या षटकापर्यंत कोलकाताचा संघ सामन्यात पुढे होता, पण त्यानंतर जसप्रीत बुमराहने सामनाच फिरवला. त्याने सामन्याच्या १५व्या षटकात २ तर १७व्या षटकात ३ विकेट्स घेत कोलकाताच्या संघाचं कंबरडं मोडलं. त्यामुळे KKR ला २० षटकांत १६५ धावांपर्यंत मजल मारता आली. बुमराहने सामन्यात १० धावा देत ५ बळी टिपले.
--
कोलकाताच्या संघाकडून अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर जोडीने अर्धशतकी सलामी दिली. पण अय्यरचं अर्धशतक हुकलं. तो २४ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेने संथ २५ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या नितीश राणाने दमदार फटकेबाजी करत २६ चेंडूत ४३ धावा कुटल्या. पण १४व्या षटकानंतर बुमराह नावाच्या वादळाने कोलकाताचा डाव उधळून लावला. श्रेयस अय्यरला मुरूगन अश्विनने ६ धावांत माघारी धाडल्यानंतर बुमराह गोलंदाजीसाठी आला. त्याने डावाच्या १५व्या षटकात आधी आंद्रे रसलला ९ धावांवर तर सेट झालेल्या नितीश राणाला ४३ धावांवर बाद केले. त्यानंतर डावाच्या १७व्या षटकात बुमराहने एकही धाव न देता तब्बल तीन बळी घेतले. त्याने पहिल्या चेंडूवर शेल्डन जॅक्सनला ५, तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सला शून्य तर चौथ्या चेंडूवर सुनील नरिनला शून्यावर बाद केले. त्यानंतर डॅनियल सॅम्सने टीम साऊदीला शून्यावर माघारी पाठवले. अखेरच्या षटकात बुमराहने केवळ एक धाव दिली. त्यामुळे १४व्या षटकात ४ बाद १३६ धावांवर असलेला KKR केवळ १६५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.