Jasprit Bumrah Special Gift IND vs ENG 1st ODI: भारतीय संघाने टी२० मालिकेतील आपली लय कायम राखत पहिली वन डे जिंकली. भारताने इंग्लंडचा त्यांच्याच भूमीवर १० गडी राखून अगदी सहज आणि प्रचंड मोठा पराभव केला. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव ११० धावांवरच आटोपला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७६ धावा कुटत संघाला विजय मिळवून दिला. शिखर धवनने नाबाद शतकी भागीदारी करत रोहितला उत्तम साथ दिली. इंग्लंडच्या संघाचा दारूण पराभव झाल्यानंतर त्यांनी मोठं मन दाखवलं. त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
--
इंग्लंडचा आपल्याच भूमीवर एकतर्फी पराभव झाला. जसप्रीत बुमराहने १९ धावांत ६ बळी टिपले. त्याच्या आजवरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. इंग्लंडच्या वरच्या फळीतील महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने माघारी धाडले. तसेच गरज पडल्यावर इंग्लंडच्या शेपटालाही ठेचले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था अतिशय वाईट झाली होती. असे असतानाही इंग्लंडने 'दर्यादिली' दाखवत जसप्रीत बुमराहचा त्याच्या कामगिरीसाठी सन्मान केला. ज्या चेंडूने त्याने पराक्रम केला, तो चेंडू (Match Ball) बुमराहला स्पेशल गिफ्ट म्हणून देण्यात आला.
दरम्यान, जसप्रीत बुमराहने अत्यंत शिस्तबद्ध असा मारा केला. जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, लियम लिव्हिंगस्टोन ही इंग्लंडची फलंदाजांची फळी बुमराहने सर्वात आधी उद्ध्वस्त केली. त्यानंतर मोहम्मद शमीने बेन स्टोक्स आणि जोस बटलरला माघारी पाठवलं. क्रेग ओव्हर्टनलाही शमीने तंबूत पाठवला. प्रसिध कृष्णाला एक बळी मिळाला. पण तळाच्या फलंदाजांनी भागीदारी करण्याची सुरूवात केली होती. त्यावेळी बुमराहला पुन्हा बोलवण्यात आले. मग बुमराहने डेव्हिड विली आणि ब्रायडन कार्स यांना तंबूचा रस्ता दाखवत डाव संपवला. त्यानंतर रोहित-शिखर जोडीने भारताला सहज विजय मिळवून दिला.