Team India Captain, Jasprit Bumrah: दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता भारतीय संघाला नव्या कर्णधाराची प्रतीक्षा आहे. यातच भारतीय संघ आता द.आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सामोरं जात आहे. या मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे संघाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. वनडे मालिकेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहनं पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. यात कसोटी संघाचा कर्णधार व्हायला आवडेल का? असंही बुमराहला विचारण्यात आलं होतं.
द.आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात जेव्हा विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर होता. तेव्हा केएल राहुलकडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. तर बुमराह याची संघाचा उप-कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियानं ज्यापद्धतीनं कसोटी संघासाठी टीम पेन याची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच धर्तीवर भारतीय संघासाठी देखील तुला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून संधी मिळाली तर तू नव्या जबाबदारीसाठी तयार आहेस का? असं पत्रकारानं बुमराहला विचारलं. "मला जी जबाबदारी दिली जाईल त्याचं पालन करण्यास मी तयार आहे. असं कोण नकार देईल. संघात प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी असते. जर मला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली तर तो माझ्यासाठी मोठा सन्मान असेल", असं जसप्रीत बुमराह म्हणाला.
बुमहारची संघातील भूमिका बदलली?जसप्रीत बुमराह याच्याकडे एकदिवसीय मालिकेसाठीचं भारतीय संघाचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर संघातील तुझ्या भूमिकेत आता बदल होणार आहे का असं विचारलं असता बुमराहनं सर्व दावे फेटाळून लावले. नवी जबाबदारी आली म्हणून तुमची भूमिका बदलत नाही. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या व्यवस्थापनाबाबत मी याआधीही सहकारी खेळाडूंशी बोलायचो. संघात जर कुणी नवा खेळाडू आला तर तोही याबाबत सर्वांशी मनमोकळेपणानं बोलतो, असं जसप्रीत बुमराह म्हणाला.
कोहलीच्या निर्णयावर काय म्हणाला बुमराह"विराट कोहलीनं घेतलेला निर्णय हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रत्येकाला आपला खेळ, शरीर, फिटनेस याची पूर्ण माहिती असते. तो भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तो नेतृत्त्व देणारा खेळाडू आहे आणि त्याच्या नेतृत्त्वाखालीच मी कसोटीत पदार्पण केलं होतं", असं जसप्रीत बुमराह म्हणाला.