भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर भारताचे खेळाडू इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयनं खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी दिली आहे आणि त्या सुट्टीत खेळाडू कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती करत आहेत. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी व टीव्ही प्रेझेंटर संजना गणेसन हे युरो स्पर्धेतील इटली विरुद्ध स्पेन हा उपांत्य फेरीचा सामना पाहायला विम्बली स्टेडियमवर पोहोचले. संजनानं सोशल मीडियावर दोघांचा फोटो पोस्ट केला आहे.
Euro 2020 semifinal : स्पेनकडून २०१२च्या यूरो स्पर्धेतील फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा इटलीनं बुधवारी काढला. विम्बली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इटलीनं पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन वेळच्या विजेत्या स्पेनचा ४-२( १-१) असा पराभव केला.
दुसऱ्या सत्रात फेडेरीको चिएसानं गोल करताना इटलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनचा बरोबरीसाठी संघर्ष सुरू झाला. निर्धारित वेळ संपण्यासाठी १० मिनिटांचा कालावधि शिल्लक असताना स्पेननं स्टार खेळाडू अलव्हारो मोराटाला मैदानावर उतरवले अन् त्यानं बरोबरीचा गोल करून सामन्यातील चुरस वाढवली. अतिरिक्त वेळेतही हिच बरोबरी कायम राहिल्यानं सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
दानी ओल्मो व मोराटा यांना गोल करण्यात अपयश आलं, तर मॅन्यूएल लोकाटेल्लीनं इटलीसाठीची पहिलीच फ्री किक चुकवली. गोलरक्षक जी डोनारुम्मानंही त्याची कामगिरी चोख बजावली. स्पेनला बरोबरी मिळवून देणारा मोराटोच पेनल्टी शूटआऊटमधील चुकलेल्या फ्री किकमुळे खलनायक ठरला. १९६८नंतर इटलीला युरो चषक जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि डेन्मार्क हे भिडणार आहेत.
Web Title: Jasprit Bumrah turns up at Wembley with wife Sanjana Ganesan to watch Italy vs Spain Euro 2020 semifinal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.