नवी दिल्ली : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. मात्र पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली होती. खरं तर मागील मोठ्या कालावधीच्या विश्रांतीनंतर बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका खेळली होती. दुखापतीमुळे त्याला आशिया चषकातून बाहेर व्हावे लागले होते, ज्याचा फटका संघाला बसला होता.
दरम्यान, कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या कालावधीतच खेळाडूंना दुखापत कशी होते असा मिश्किल प्रश्न चाहते विचारत आहेत. आगामी महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. तर सततच्या विश्रांतीमुळेच खेळाडूंचा फॉर्म जात असल्याचे अनेक दिग्गज म्हणत आहेत. अशा परिस्थितीत बुमराहची दुखापत भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणारी आहे. यावरूनच चाहत्यांनी बीसीसीआय आणि कर्णधार रोहित शर्माबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी नाराजीचे वातावरण आहे. तिरूवनंतपुरमच्या मैदानावर सराव करताना त्याला दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली आणि नंतर त्याला पहिल्या सामन्यातून बाहेर राहण्याचा सल्ला दिला. बुमराहला अचानक संघातून वगळल्यामुळे चाहते बीसीसीआयवर निशाणा साधत आहेत. खरं तर अलीकडेच बुमराहने दुखापतीतून सावरली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन केले होते. मालिकेतील दुसरा सामना खेळण्याची त्याला संधी मिळाली.
भारताची विजयी सलामीभारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने विजयी सलामी दिली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंग आणि दीपक चहर यांच्या आक्रमक माऱ्यासमोर आफ्रिकी फलंदाज पूर्णपणे चितपट झाले. दीपक चाहरने पहिल्याच षटकात आफ्रिकी कर्णधार टेम्बा बवुमाचा त्रिफळा उडवला. तर अर्शदीप सिंगने घातक सलामीवीर क्विंटन डीकॉकला तंबूत पाठवले. त्याने 4 षटकांत एकूण 32 धावा देऊन 3 बळी पटकावले. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 बाद 106 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताकडून सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला.