मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि प्रत्येक संघाकडे मोजकेच सामने राहिले आहेत. त्यामुळे सर्व संघ वर्ल्ड कप स्पर्धेला सामोरे जाण्यापूर्वी आपापल्या अंतिम शिलेदारांची चाचपणी करत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघच संतुलित दिसत आहे आणि वर्ल्ड कप साठीचा संघ जवळपास निश्चितच झाला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. या स्पर्धेत भारताचा जसप्रीत बुमरा प्रतिस्पर्धी संघासाठी कर्दनकाळ ठरेल, असा विश्वास महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केला आहे.
मागील काही महिन्यांत बुमराने आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना हतबल केले. आयसीसी वन डे क्रमवारीत त्याने गोलंदाजांत अव्वल स्थानही पटकावले आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत बुमरा हा भारतीय संघाचा ट्रम्प कार्ड ठरणार आहे, असे तेंडुलकरला वाटते. तो म्हणाला, '' बुमराच्या यशाचे मला आश्चर्य वाटलेले नाही. तो मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे आणि त्याचा खेळ मी जवळून पाहिला आहे. तो आज्ञाधारक आहे आणि कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तो सातत्याने प्रामाणिक प्रयत्न सुरू असतात. जगातील फलंदाजांना त्याचा सामना करताना संघर्ष करावा लागेल, हे मला नेहमी वाटत होते.''
बुमराने मागील वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्याने 2018 मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना 10 कसोटींत 49 विकेट्स घेतल्या. त्याबद्दल तेंडुलकर म्हणाला,''त्याच्या खेळात होत गेलेला बदल मी जवळून पाहिला आहे. संकटावर मात करण्याच्या त्याच्या वृत्तीची प्रचिती मला 2015 मध्येच आली होती. बुमराने मिळवलेल्या यशाने मी आनंदीत आहे. शैली आणि विविधता, त्यात विकेट घेण्याचे सातत्य, यामुळे तो एक घातकी गोलंदाज ठरतो. आखलेल्या रणनीतीची अंमलबजावणी कशी करायची, याची त्याला जाण आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत तो भारताचा प्रमुख अस्त्र आहे.''