जसप्रीत बुमराह हा भारतीय क्रिकेट संघातील एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याने देशांतर्गत आणि परदेशातही आपल्या धारदार गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांना घाम फोडला आहे, गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. खरे तर, पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) ऑस्ट्रेलियाने ३-१ अशा फरकाने जिंकली. मात्र, बुमराहने कांगारू घाम फोडला होता. मालिका विजयानंतर, आता ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने बुमराहचे कौतुक केले आहे. तसेच एक मोठा दावाही केला आहे.
जर सर डॉन ब्रॅडमन यांनी बुमराहच्या गोलंदाजीचा सामना केला असता, तर त्यांनाही घाम फुटला असता, असे अॅजम गिलख्रिस्टने म्हटले आहे. गिलख्रिस्ट म्हणाला, "बुमराहने जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या ब्रॅडमन यांनाही आपल्या गोलंदाजीने घाम फोडला असता आणि त्याचा विश्वविक्रमही असा नसता." ब्रॅडमन यांनी १९२८ ते १९४८ या कालावधीत ऑस्ट्रेलियासाठी एकूण ५२ कसोटी सामने खेळत ६९९६ धावा ठोकल्या आहेत. त्याची सरासरी ९९.९४ एवढी होती. गेल्या ७० वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीच्या सरासरीच्या जवळपासही अद्याप कुण्या फलंदाजला जाता आलेले नाही.
'क्लब प्रेयरी फायर पॉडकास्ट'वर बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला की, "मी त्याला रेटिंग देत नाहीये. वर्ल्ड स्पोर्टमध्ये त्याच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी कुठलीही संख्या नाही. गोलंदाजीच्या बाबतीत तो डॉन ब्रॅडमन यांनाही घाम फोडू शकला असता. तो 99 (ब्रॅडमन यांची फलंदाजीची सरासरी) पेक्षा फार खाली असता."
महत्वाचे म्हणजे, बुमराहने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत एकूण ३२ विकेट्स घेतल्या आहेत. तो बीजीटी मालिकेत संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याला बीजीटीमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून सन्मानित करण्यात आले.