मुंबई : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी हार्दिक पांड्याचामुंबई इंडियन्सच्या संघात समावेश झाला आहे. दोन वर्ष गुजरात टायटन्सच्या संघाची धुरा सांभाळणाऱ्या पांड्याची अचानक मुंबईच्या ताफ्यात एन्ट्री झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मागील दोन दिवसांत हार्दिकबद्दल अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अष्टपैलू खेळाडू नक्की कोणत्या फ्रँचायझीसाठी खेळणार याबाबत संभ्रम होता. पण, सोमवारी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर हार्दिकने देखील घरवापसी झाल्यामुळे आनंद व्यक्त केला. मात्र, आता हार्दिकच्या एन्ट्रीमुळे मुंबईच्या ताफ्यात नाराजीनाट्य सुरू असल्याचे कळते.
मुंबईचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहने याबाबत संकेत दिले. खरं तर रोहित शर्मानंतर जसप्रीत मुंबईचा कर्णधार होईल हे जवळपास स्पष्ट होते. पण, आता पांड्याची घरवापसी झाल्यानंतर बुमराहची अडचण झाली असल्याची चर्चा आहे. अशातच त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवून बोलकी प्रतिक्रिया दिली. लक्षणीय बाब म्हणजे एका वाक्यातच बुमराहने बरेचकाही सांगितले. "कधीकधी शांत राहणे हेच सर्वोत्तम उत्तर असते", असे बुमराहने म्हटले.
दरम्यान, क्रिकेट वर्तुळात मागील दोन दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू असलेला हार्दिक पांड्या सोमवारी अधिकृतरित्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य झाला. पांड्याने आपल्या संघात घरवापसी केली असून आयपीएल २०२४ मध्ये तो मुंबईच्या ताफ्यात दिसणार आहे. हार्दिक पांड्याला त्याच्या घरच्या संघात जायचे होते, त्याचीच इच्छा असल्याकारणानेच त्याला मुंबईच्या संघात पाठवले गेले, असे गुजरातच्या फ्रँचायझीने स्पष्ट केले.
मुंबईच्या ताफ्यात 'हार्दिक' स्वागतमुंबईच्या फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिकची घरवापसी होत असल्याचे जाहीर केले तसेच त्याचे आपल्या ताफ्यात स्वागत केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला.