मुंबई : तुम्ही कितीह यशस्वी झालात तरी तुम्हाला स्ट्रगलचे दिवस आठवल्याशिवाय राहत नाही. यशस्वी झाल्यावर साऱ्या गोष्टी तुमच्या पायाशी लोळण घेत असतीलही, पण ते जुने दिवस तुम्हाला आठवतात आणि आपसूकच डोळ्यातन पाणी वाहायला सुरुवात होते. अशीच गोष्ट घडली ती भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या आईबाबत. पण नेमके असे घडले तरी काय होते...
बुमराची आई दलजित, ही शाळेमध्ये शिक्षिका होती. बुमराचे बाबा तो लहान असतानाच वारले. त्यानंतर त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. आईकडून सर्वच लाड आता पूर्ण होत नव्हते. परिस्थिती बेताचीच होती. घर चालवायचं की जसप्रीतच्या क्रिकेटच्या वेडासाठी नवीन वस्तू घ्यायच्या, हा प्रश्न दलजित यांच्यापुढे होता. नक्कीच, त्यांनी घर चालवायला प्रधान्य दिलं.
जसप्रीतकडे त्यावेळी फक्त एक जोडी शूज होते, एक टी-शर्ट होतं. त्यावेळी तो मला शूज हवेत, म्हणून आईच्या मागे लागला होता. ते दोघे एका शूजच्या दुकानात गेलेही, पण तिथे शूजची किंमत बघून ते परतले. तेव्हा सर्वात जास्त दु:ख जसप्रीतपेक्षा त्याच्या आईला झाले होते. एका व्हिडीओमध्ये तिने या साऱ्या गोष्टी सांगितल्या, त्यावेळी दलजित यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
जसप्रीतची आई यावेळी म्हणाली की, " जसप्रीत पाच वर्षांचा असताना त्याचे बाबा आमच्यामध्ये राहिले नाहीत. त्यानंतर मला आर्थिकदृष्ट्या घर चालवणे अवघड होते. कारण परिस्थिती बेताचीच होती. त्यावेळी जसप्रीतने माझ्याकडे शूज घेण्याचा हट्ट केला होता. पण मी त्याला शूज घेऊन देऊ शकली नव्हती आणि आता पाहा त्याच्याकडे किती शूज आहेत."
आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकिण नीता अंबानी या लंडनमध्ये एका कार्यक्रमात बोलत होता. त्यावेळी त्यांनी ही आठवण सांगितली.