भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा संघात येण्याच्या तयारीत आहे. या खेळाडूने गोलंदाजीची प्रॅक्टिसही सुरू केली आहे. दुखापतीनंतर 8 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा अनुभवी गोलंदाज नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला. विशेष म्हणजे, जसप्रीत बुमराहचा सहकारी असलेल्या या गोलंदाजाने चाहत्यांना आनंदाची बातमी देत गोलंदाजीचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. भारतात गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषकादरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्याला सर्जरीचा सामनाही करावा लागला आहे.
टीम इंडियाच्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाचे नाव आहे मोहम्मद शमी. शमी दुखापतीतून सावरला असून त्याने गोलंदाजीचा सरावही सुरू केला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या शमीने मंगळवारी गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शमी शॉर्ट आणि स्लो रनअपसह गोलंदाजी करताना दिसत आहे. तो हळूहळू फिटनेस परत मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तो भारतात खेळल्या जाणाऱ्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी पुनरागमन करेल, असी अपेक्षा आहे.
2023 च्या विश्वचषकात जबरदस्त कामगिरी - मोहम्मद शमी 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी विश्वचषकात दुखापत झालेली असतानाही सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरी सामन्यात त्याने एकूण 7 बळी घेतले होते. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला फारशी कमाल करता आली नव्हती. या सामन्यात त्याला केवळ 1 बळी घेता आला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेटने जिंकला होता आणि भारताचे विश्वचषकाचे स्वप्न स्वप्नच राहिले होते. विश्वचषकानंतर मोहम्मद शमीला अकिलीस टेंडनची शस्त्रक्रिया करावी लागली.
याशिवाय, दुखापतीमुळे शमी, ऑस्ट्रेलिया सोबतची होम सीरीज आणि आयपीएल 2024 नंतर, नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात खेळू शकला नाही.