नवी दिल्ली : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे. रविवारी भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. अशातच सोमवारी बुमराहच्या पत्नीने एक जुना फोटो शेअर केला होता. मात्र त्यानंतर काही लोकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केली. याला उत्तर देताना बुमराहची पत्नी संजनाने ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच अनेक युजर्संनी या जोडप्याच्या फोटोवर चांगल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. बुमराह लवकर दुखापतीतून बरा होऊन मैदानात दिसेल अशी आशाही चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
बुमराहला ट्रोल करणाऱ्याला संजनाने दिले प्रत्युत्तर संजनाने सोमवारी बुमराह सोबत एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तिने म्हटले, "जसप्रीतसोबत प्रेमळ जुना फोटो आहे." हा फोटो शेअर करताना संजनाने थ्रोबॅक हॅशटॅगही वापरला आहे. फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. कदाचित बाहेर फिरण्यासाठी गेले असतानाचा हा फोटो असावा.
तरीदेखील एका युजर्सने बुमराहला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि अशा कमेंट केल्या ज्यात आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आला होता. ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी संजनाने उत्तर दिले आणि लिहिले, "थ्रोबॅक फोटो आहे, दिसत नाही का चोमू आदमी?", संजनाने सणसणीत प्रत्युत्तर देऊन टीका करणाऱ्या व्यक्तीला एका शब्दातच गप्प केले.
दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेरआशिया चषक सुरू होण्यापूर्वी झालेल्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहला या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. त्याच्या पाठीला दुखापत झाली असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तो नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सराव करतानाही दिसला होता. त्यामुळे भारताचा प्रमुख गोलंदाज क्रिकेटच्या मैदानावर कधी पुनरागमन करतो हे पाहण्याजोगे असेल. भारतीय संघाला टी-20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत मालिका खेळायची आहे.