नवी दिल्ली - आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यात कर्णधार विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारकडून गोलंदाजीची सुरुवात करावी. तो या दौ-यात भारतासाठी हुकूमी भूमिका बजावू शकतो असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने व्यक्त केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेट मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. सध्याच्या घडीला भारताकडे उत्तम वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे.
मागच्या एक-दीड वर्षातील भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर भुवनेश्वर कुमार भारतीय संघासाठी स्ट्राईक बॉलर बनू शकतो असे मला वाटते. छोटया-छोटया स्पेलमध्ये त्याचा योग्य वापर करुन घ्यावा. मागच्या काही महिन्यात त्याने उत्तम प्रदर्शन केले आहे. वेगवान गोलंदाजीबरोबर दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची भुवनेश्वरकडे क्षमता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या उसळी घेणा-या खेळपट्टीवर भुवनेश्वर भारतीय संघासाठी उपयुक्त ठरेल असे मत श्रीनाथने व्यक्त केले.
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली 25 वर्षांपूर्वी श्रीनाथने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. दक्षिण आफ्रिकेतल्या आठ कसोटी सामन्यांमध्ये श्रीनाथच्या नावावर 43 विकेट आहेत. दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकदाही भारतीय संघ कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. पराभवाची ही मालिका खंडीत करण्याचे लक्ष्य विराटसमोर असेल. सध्याचा कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ याआधीच्या संघांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे असे श्रीनाथला वाटते. श्रीनाथकडे सध्या आयसीसीचा सामनाधिकारी म्हणून जबाबदारी आहे.
रवींद्र जडेजा रुग्णालयात भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौ-यात पहिली कसोटी सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू रवींद्र जडेजा याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तापामुळे गेल्या दोन दिवसांपासून रवींद्र जडेजाला त्रास जाणवत होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने बीसीसीआयचे वैद्यकीय पथक जडेजाच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. पुढील ४८ तासांत जडेजाच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असा अंदाज स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केला. पहिल्या कसोटीसाठी जडेजाचा संघात समावेश करायचा की नाही, याचा निर्णय अखेरच्या दिवशी घेण्यात येईल.