Jai Shah BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांची पुन्हा एकदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) अध्यक्षपदी निवड झाली आहे. या वर्षी होणाऱ्या आयसीसी (ICC) अध्यक्षपदाच्या शर्यतीतही जय शाह आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. जय शाह हे गेल्या तीन वर्षांपासून बीसीसीआयचे सचिव आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बोर्डात अनेक मोठे बदलही झाले आहेत.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जय शाह यांना बीसीसीआयकडून कोणतेही वेतन मिळत नाही. बीसीसीआयच्या सर्व अधिकाऱ्यांसाठी कोणतेही निश्चित मासिक किंवा वार्षिक वेतन नाही. मात्र, मंडळाच्या अधिका-यांना इतर अनेक सुविधा मिळतात. यात इतर राज्ये किंवा देशात बैठकीला जाण्या-येण्याचा प्रवास, यासह इतर अनेक गोष्टी पुरवल्या जातात.
अधिकाऱ्यांना किती पैसे मिळतात?बीसीसीआयने ऑक्टोबर 2022 च्या एजीएम बैठकीनंतर अधिकाऱ्यांच्या खर्चात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. बोर्डाच्या अधिकाऱ्यांना देशातील कोणत्याही बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दररोज 40 हजार रुपये भत्ता मिळतो, तर परदेशात होणाऱ्या बैठकांसाठी अधिकाऱ्यांना दररोज 80 हजार रुपये भत्ता मिळतो.
एवढेच नाही तर देशात असो किंवा परदेशात, प्रत्येक अधिकाऱ्याला प्रवासासाठी बोर्डाकडून बिझनेस क्लासचे तिकीट मिळते. या सुविधा फक्त बीसीसीआयचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि इतर काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की BCCI अधिकारी इतर बोर्डांमध्येदेखील काम करतात, ज्याप्रमाणे जय शाह बीसीसीआय सचिव तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. तिथेही केवळ बैठकीच्या आधारे भत्ता दिला जातो.