T20 World Cup 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम संपताच पुढील महिन्यापासून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्याच वेळी बीसीसीआय नवीन अर्जदारांच्या शोधात आहे. टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकासाठी बीसीसीआय लवकरच अर्ज मागवू शकते. त्यानंतर राहुल द्रविड यांच्या जागी नवीन प्रशिक्षकाची निवड केली जाईल.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाला लवकरच नवीन गुरू मिळणार आहे. जय शाह म्हणाले की, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. प्रशिक्षकपदावर कायम राहायचे असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल. खरे तर अलीकडेच द्रविड यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. पण, राहुल द्रविड यांचा कार्यकाळ फक्त ट्वेंटी-२० विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले, असे वृत्त 'क्रिकबज'ने दिले आहे.
टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू?
तसेच आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवणार आहोत. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ ट्वेंटी-२० विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला होता. म्हणजेच ते जूनपर्यंत भारतीय संघासोबत असतील. याशिवाय त्यांना पुन्हा एकदा ही जबाबदारी सांभाळायची असेल तर पुन्हा अर्ज करावा लागेल, असेही जय शाह यांनी सांगितले. दरम्यान, टीम इंडियाने राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली वन डे विश्वचषक २०२३ खेळला.
Web Title: Jay Shah confirms the BCCI will soon release an advertisement for a new Head Coach, Rahul Dravid's contract is till June, if he wishes then he can reapply
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.