Sachin Tendulkar in Indian Cricket: भारतीय क्रिकेटमधील काही महान खेळाडू सध्या देशाच्या नवी पिढी घडवत आहेत किंवा भारतीय क्रिकेटच्या प्रशासकीय विभागात आपली भूमिका चोख बजावत आहेत. महान कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षस्थानी आहे. राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतो आहे. तर व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी कार्यरत असून नवी पिढी घडवत आहे. असं असताना त्यांच्यासोबत असणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर मात्र भारतीय क्रिकेटमध्ये सध्या कुठे दिसत नाहीये. हाच मुद्दा लक्षात घेत BCCI चे सचिव जय शाह हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला BCCI च्या किंवा भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी साकडं घालत असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले होते की सचिन तेंडुलकरला भारतीय क्रिकेटमध्ये एखादं महत्त्वाचं पद दिलं जायला हवं. आता सचिनला यासाठी राजी करण्याची जबाबदारी जय शाह यांच्यावर असल्याचे दिसत आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, BCCI सचिव जय शाह हे राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याप्रमाणेच सचिन तेंडुलकरलाही भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या पदावर आणण्यासाठी उत्सुक असून त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, असं बोललं जात आहे.
जय शाह हे मीडिया आणि इतर गोष्टींपासून दूर आहेत. पण त्यांना भारतीय क्रिकेटच्या भरभराटीसाठी काय करावं याचं उत्तम ज्ञान आहे. राहुल द्रविडला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडण्यात आलं आहे. महान फलंदाज असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसारख्या जबाबदारीच्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची संधी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे सचिन तेंडुलकरदेखील भारतीय क्रिकेटमध्ये एखाद्या महत्त्वाच्या स्थानावर दिसेल आणि त्यासाठी जय शाह हे तेंडुलकरशी सातत्याने संवाद साधत आहेत, असं वृत्त बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच सचिनदेखील BCCIमध्ये किंवा भारतीय क्रिकेटमध्ये सक्रीयरित्या कार्यरत होताना दिसू शकतो अशी चर्चा आहे.