jay shah icc chairman : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. या शर्यतीत बीसीसीआय सचिव जय शाह यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वत्र चर्चा आहे. १६ पैकी १५ सदस्यांचा जय शाह यांना पाठिंबा असल्याने ते आयसीसीचे नवे अध्यक्ष असतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे जय शाह यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी खूप कमी वेळ उरला आहे, कारण अधिकृत नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत २७ ऑगस्ट ही आहे.
दरम्यान, जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष होणार असल्याचे कळते. तर बीसीसीआयच्या सचिवपदी रोहन जेटली यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 'दैनिक भास्कर'ने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सचिवपदासाठी रोहन जेटली यांचे नाव आघाडीवर आहे. अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि इतर पदाधिकारी आपापल्या पदावर कायम राहतील. या सर्वांचा कार्यकाळ एक वर्षानंतर पूर्ण होणार आहे. जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी सायंकाळी अर्ज करू शकतात. त्यामुळे त्यांना बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागेल.
दरम्यान, आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत आहे. रोहन जेटली हे भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांचे पुत्र आहेत. तसेच ते दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे (DDCA) अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे विश्वचषकाचे पाच सामने खेळवले गेले. त्यांनीच दिल्ली प्रीमिअर लीगचे आयोजन केले, ज्यात रिषभ पंतसारख्या नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला. जय शाह २०१९ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव बनले. त्यानंतर २०२२ मध्ये दुसऱ्यांदा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली. २०२५ मध्ये त्यांच्या या पदाचा कार्यकाळ संपुष्टात येईल.