T20 World Cup 2024 - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली. सलग १० सामन्यांत निर्विवाद वर्चस्व गाजवून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ फायनलमध्ये पोहोचला. पण, आयसीसी स्पर्धेतील 'दादा' ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये वरचढ ठरला. भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद जिंकण्यात अपयश आले. आता टीम इंडिया आणि BCCI २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. बीसीसीआयने एक बैठक बोलावली आणि त्यात रोहित व विराट कोहली यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळवायचे की नाही यावर चर्चा झाली. त्यात रोहितकडेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधारपद कायम राखावे असा सूर होता. रोहितनेही तसे आश्वासन मागितल्याचे वृत्त समोर आले. पण, आज बीसीसीआय सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी स्पष्ट विधान केले.
विराट कोहली-रोहित शर्मा यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप का खेळायला हवा? जाणून घ्या ५ कारणं
रोहित शर्माला ट्वेंटी-२० संघात निवड करण्याबाबत कोणतेही आश्वासन देता येणार नाही, असे शाह यांनी स्पष्ट केले. कॅरिबियन आणि यूएस मध्ये ३ ते ३० जून रोजी वर्ल्ड कप होणार आहे. रोहितने मागील दीड-एक वर्ष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळलेला नाही आणि त्याच्या अनुपस्थित हार्दिक पांड्याने ट्वेंटी-२० संघाची धुरा सांभाळली. आता पांड्याच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील ३ सामन्यांच्या मालिकेत कर्णधार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने ४-१ असा विजय मिळवला.
“आत्ता स्पष्टता असण्याची काय गरज आहे? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जूनमध्ये सुरू होत आहे, त्याआधी आमच्याकडे आयपीएल आणि अफगाणिस्तानविरुद्धची मालिका आहे. त्यामुळे जो निर्णय घेऊ तो चांगलाच असेल,” असे शाह यांनी महिला प्रीमियर लीग लिलावाच्या वेळी सांगितले. शाह यांनी हार्दिक पांड्याच्या फिटनेस स्थितीबद्दल अपडेट देखील दिले. "त्याच्यावर दैनंदिन निरीक्षण केले जात आहे. तो NCAमध्ये आहे. तो खूप मेहनत घेत आहे. आम्ही तुम्हाला योग्य वेळी कळवू. तो अफगाणिस्तान मालिकेपूर्वीही फिट होऊ शकतो," असेही त्यांनी सांगितले. मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका मालिकेत सहभागी होऊ शकतो, असे संकेतही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिले.