भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी सांगितले की, आशिया चषक स्पर्धेतील ठिकाणाचा निर्णय हा आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यानंतर होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल. या बैठकीमध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. जय शाह यांनी सांगितले की, आशिया चषकासाठीच्या आयोजन स्थळाबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. आम्ही आयपीएलच्या आयोजनामध्ये गुंतलेलो होतो. मात्र आता श्रीलंका क्रिकेट, बांगलादेश आणि अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी येणार आहेत. आम्ही त्यावर चर्चा करून योग्य वेळी निर्णय घेऊ.
यावर्षी आशिया चषक २०२३चा यजमान देश पाकिस्तान आहे. मात्र बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय भारतीय संघाल शेजारील देशात पाठवू शकणार नाही. अशा परिस्थितीत पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी एक हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यात चार सामन्यांचं आयोजन त्यांच्या देशात होईल. तर एसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नजम सेठी यांच्या फॉर्म्युल्यानुसार श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान यांचे साखळी फेरीतील सामने हे पाकिस्तानात होतील. तर भारत आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळेल. भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा सामना श्रीलंकेत खेलवला जाऊ शकतो. मात्र पीसीबी या सामन्याचे दुबईमध्ये आयोजन करण्यासाठी आग्रही आहे.
एसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसीसीचे प्रमुख जय शाह कार्यकारी बोर्डाची बैठक बोलावतील. तिथे याबाबत अंतिम घोषणा केली जाईल. पीसीबीला भारताविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळण्याबाबत काहीही अडचण नाही आहे. मात्र सामना दुबईत व्हावा यासाठी ते आग्रही आहेत. यावर्षी १ ते १७ सप्टेंबर या काळात आशिया चषक क्रिकेट स्पर्धा नियोजित आहे. मात्र यावर्षी स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने त्यावरून दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये तणावाचं वातावरण आहे.