गाले : ३१ वर्षांचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने तीन धक्के देताच आक्रमक सुरुवात करणारा पाकिस्तान संघ पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी बॅकफूटवर आला. यजमान संघाच्या ३२१ धावांचा पाठलाग करताना पाकने दिवसअखेर ४५ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात २२१ अशी मजल गाठली.
सौद शकील ६९ आणि आगा सलमान ६१ हे खेळपट्टीवर असून बरोबरीसाठी त्यांना ९१ धावांची गरज आहे. पावसामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला.
प्रभातने अब्दुल्ला शफिक १९, कर्णधार बाबर आझम १३ आणि सरफराज अहमद १७ यांना माघारी धाडले. इमाम उल हक याला रजिथाने तर शॉन मसूदला रमेश मेंडिसने बाद केले. त्याआधी, धनंजय डीसिल्वाचे शानदार शतक आणि अँजेलो मॅथ्यूजच्या ६४ धावांमुळे लंकेने ३१२ पर्यंत मजल गाठली. पाकिस्तानकडून डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद यांनी ३-३ बळी घेतले. धनंजय डीसिल्वाची ही ५० वी कसोटी आहे. लंकेसाठी त्याने दहावे शतक झळकावले असून पाकिस्तानविरुद्ध त्याचे हे तिसरे शतक आहे.
पाच वर्षांपूर्वी धनंजयला मोठा धक्का बसला होता. त्याच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्याची वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवड झाली होती. मात्र, पहिल्या कसोटीनंतर तो पुन्हा संघात दाखल झाला होता. अष्टपैलू म्हणून त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. कसोटीत त्याच्या ३१५२ कसोटी धावा असून ३४ बळी आहेत.
श्रीलंका पहिला डाव : ९५.२ षटकांत सर्व बाद ३१२ (धनंजय डिसिल्व्हा १२२, अँजेलो मॅथ्यूज ६४, सदीरा समरविक्रमा ३६, दिमुथ करुणारत्ने २९, विश्वा फर्नांडो नाबाद २१. गोलंदाजी : शाहीनशाह आफ्रिदी ३-८६, नईम शाह ३-९०, अबरार अहमद ३-६८.
पाकिस्तान पहिला डाव : ४५ षटकांत ५ बाद २२१ (सौद शकील खेळत आहे ६९, आगा सलमान खेळत आहे ६१, शान मसूद ३९, अब्दुल्ला शफिक २१) गोलंदाजी : प्रभात जयसूर्या ३-८३, कसून रजिथा १-३३, रमेश मेंडिस १-६३.
Web Title: Jayasuriya gave a blow to Pakistan, half of Pakistan's team retreated for 221 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.