West Indies vs Bangladesh, 2nd Test : वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील जेडन सील्स (Jayden Seales) याने जमेकाच्या मैदानात सुरु असलेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत जबरदस्त स्पेल टाकालाय. १५.५ षटके गोलंदाजी करताना १० निर्धाव षटकांसह ५ धावा खर्च करुन त्याने बांगलादेशच्या ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका डावात सर्वात कमी इकॉनॉमी रेटसह गोलंदाजी करणारा तो सातवा गोलंदाज ठरलाय.
उमेश यादवचा विक्रम मोडला
कसोटी क्रिकेटमध्ये मागील जवळपास ४६ वर्षांत अशी कामगिरी कुणाला जमली नव्हती. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वात कमी इकॉनॉमी रेटसह गोलंदाजी करताना कॅरेबियन गोलंदाजानं भारताच्या उमेश यादवचा विक्रम मोडित काढला. उमेश यादवनं २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात २१ षटकात त्याने ९ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या होत्या. उमेश यादवनं ०.४२ इकॉनॉमी रेटसह गोलंदाजी करताना १६ षटके निर्धाव टाकली होती.
१९७८ नंतर अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी करणाऱ्या जेडन सील्स याने १५.५ षटकात १० निर्धाव षटके टाकताना फक्त ५ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीत त्याचा इकॉनमी रेट ०.३० असा होता. १९७८ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी इकॉनॉमी रेटसह गोलंदाजी करण्याचा खास पराक्रम करून त्याने लक्षवेधून घेतलं आहे.
या भारतीय गोलंदाजाच्या नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड
३२ षटकात २७ निर्धाव षटके टाकताना बापू नाडकर्णी यांनी फक्त ५ धावा खर्च केल्या होत्या. या डावात त्यांना एकही विकेट मिळाली नसली तरी ०.१५ इकॉनॉमी रेटसह गोलंदाजी करण्याचा खास पराक्रम त्यांनी नोंदवला. हा विक्रम आजही अबाधित आहे.
कसोटीत लक्षवेधी स्पेल टाकणारे अन्य गोलंदाज या यादीत मनिंदर सिंग यांचेही नाव आहे. १९८६ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताच्या या दिग्गजानं २०.४ षटके गोलंदाजी करताना १२ निर्धाव षटकांसह ९ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या होत्या. ग्रेग चॅपल यांनी १९७९ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात ११ षटकातील ६ षटके निर्धाव टाकत ५ धावा खर्च करून एक विकेट घेतली होती. २०१४ मध्ये नॅथन लायन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२षटकातील १७ षटके निर्धाव टाकताना १० धावा खर्च केल्या होत्या.