नवी दिल्ली - भारत आणि बांगलादेशच्या संघांमध्ये आज तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या मालिकेसाठी जखमी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागी एका अशा खेळाडूला संधी दिली आहे जो आपला शेवटचा कसोटी सामना १२ वर्षांपूर्वी खेळला होता.
भारतीय संघातील सीनियर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेनंतर कसोटी मालिकेतूनही बाहेर झाला आहे. त्याच्या जागी ३१ वर्षीय जयदेव उनाडकट याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. जयदेव उनाडकटने भारताकडून शेवटचा कसोटी सामना २०१० मध्ये खेळला होता.
३१ वर्षीय डावखुरा गोलंदाज असलेल्या जयदेव उनाडकट याने त्याच्या कारकिर्दीतील एकमेव कसोटी सामना २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये खेळला होता. तेव्हापासून त्याने सात वनडे आणि १० टी-२० सामने खेळले आहेत. मात्र त्याला संघातील स्थान टिकवता आले नव्हते. हल्लीच आटोपलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत जयदेव उनाडकटने सर्वाधिक बळी टिपले होते. त्याने १० सामने खेळताना १९ बळी टिपले होते. या शानदार खेळामुळे त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.