कॅरेबिनय प्रीमिअर लीग : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जेपी ड्युमिनीनं शुक्रवारी कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार फटकेबाजी केली. पहिल्या पाच चेंडूंत केवळ तीन धावा करणाऱ्या ड्युमिनीनं त्यानंतर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धु धु धुलाई केली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर बार्बाडोस ट्रायडंट्स संघाने 63 धावांनी ट्रिनबागो नाइट रायडर्सवर विजय मिळवला.
ड्युमिनीनं 15 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. त्याने एकूण 20 चेंडूंत 7 षटकार व 4 चौकारांसह 65 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर बार्बाडोस संघाने 5 बाद 195 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात रायडर्सचा संपूर्ण संघ 129 धावांत माघारी परतला. हेडन वॉल्शने 19 धावांत 5 विकेट्स घेतल्या.
बार्बाडोस संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनसन चार्ल्स ( 58) आणि जॉनथन कार्टर ( 51) यांनी पहिल्या विकेटसाठी 14 षटकांत 110 धावांची भागीदारी केली. हे दोघेही माघारी परतल्यानंतर ड्युमिनीनं रायडर्सच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. त्याने पहिल्या पाच चेंडूंत तीनच धावा केल्या होत्या, त्यानंतर पुढील 10 चेंडूंवर त्यानं 6 षटकार खेचत 47 धावा चोपल्या. ड्युमिनीनं 15 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना रायडर्सच्या सुनील नरेन आणि लेंडल सिमन्स यांनी 3.3 षटकांत 44 धावा केल्या. पण, त्यानंतर जेसन होल्डर आणि हैरी गर्नी यांनी त्यांना माघारी पाठवले. कॉलिन मुन्रो आणि दिनेश रामदीन यांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या 10 षटकांत रायडर्सना 112 धावा हव्या होत्या. पण, त्यांचा संघ 17.4 षटकांत 129 धावांत तंबूत परतला.