नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून आपल्या धडाकेबाज फलंदाजीने प्रभावित केलेल्या युवा यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोष आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांना बीसीसीआयने २०२२-२३ सत्रासाठी जाहीर केलेल्या केंद्रीय करामध्ये ‘ब’ गटात बढती मिळाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी महिला क्रिकेटपटूंचे केंद्रीय करार जाहीर केले. शिखा पांडे आणि तानिया भाटिया यांना केंद्रीय करारामध्ये स्थान मिळाले नाही.
बीसीसीआयने अ, ब आणि क गटानुसार करार जाहीर केले. यामध्ये खेळाडूंना सामना मानधनाव्यतिरिक्त ५० लाख (अ), ३० लाख (ब) आणि (क) १० लाख रुपये मिळतात. अ गटामध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा या तीन खेळाडूंना स्थान दिले आहे. फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडला ब गटात स्थान दिले आहे. गेल्या वेळी अ गटात असलेल्या लेगस्पिनर पूनम यादवला यंदा करार लाभला नाही. तिने मार्च २०२२ पासून भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरला ब गटात स्थान मिळाले असून, अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिलाही बीसीसीआयने करारबद्ध केलेले नाही. गेल्या वर्षी महिला क्रिकेटपटूंसाठीही समान वेतन देण्याचे जाहीर केलेल्या बीसीसीआयने २०२२-२३च्या सत्रासाठी एकूण १७ खेळाडूंना करारबद्ध केले आहे.
करारबद्ध खेळाडू अ गट : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा ब गट : रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड. क गट : मेघना सिंग, देविका वैद्य, एस. मेघना, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकार, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल, यास्तिका भाटिया.