- कमलाकर कांबळे
नवी मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलांदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने नवी मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेटपट्टूंशी मुक्त संवाद साधत त्यांना यशाचा मार्ग सांगितला. नियमित सराव, स्वंयशिस्त आणि योग्य मार्गदर्शन याची सांगड घातली तर यश नक्कीच मिळेल, असा मंत्र जेमिमाहने या खेळाडूंना दिला.
बांगलादेशात १ ऑक्टोबरपासून महिला आशिया कप स्पर्धा सुरू होत आहे. दु:खापतीच्या कारणाने इंग्लड दौऱ्याला मुकलेली जेमिमाहची आशिया कपसाठी अंतिम संघात निवड झाली आहे. बांगलादेशला रवाना होण्यापूर्वी तिने नवी मुंबईच्या बेलापूर येथील भारतरत्न राजीव गांधी स्टेडियममध्ये दोन दिवस कसून सराव केला. नवी मुंबईतील नियती जगताप, पूर्वा केंडे, मंथन कांबळे, अयान अजीन, चिराग सिंग, प्रियदर्शनी सिंग, राजवर्धन जाधव, साेहम बालशेटवर, ओम मिश्रा या उदयोन्मुख खेळाडूंनी तिला गोलंदाजी केली.
सराव सत्र संपल्यानंतर तिने या सर्व खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे कौतूक केले. विशेषत: नवी मुंबईत सराव करण्याचा अनुभव खूप चांगला आहे. आशिया कप खेळण्यापूर्वी मला सराव करण्याची गरज होती. मुंबईत पावसामुळे मला सरावासाठी मैदान उपलब्ध होवू शकले नाही. त्यामुळे मी विकास साटम यांना संपर्क केला. त्यांनी तातडीने मला येथे येण्याचे निमंत्रण दिले. खरे तर मी विविध ठिकाणच्या मैदानावर सराव केला आहे. परंतू नवी मुंबईत मिळणारे प्रेम आणि अपुलकी वेगळीच असल्याचे जेमिमाहने सांगितले. सध्या देशासाठी आशिया कप जिंकणे हाच ध्यास असल्याने त्याच जिद्दीने आमचा संघ मैदानात उतरेल, असेही तिने यावेळी स्पष्ट केले आहे.
यावेळी तिचे प्रशिक्षक प्रशांत शेट्ये, नवी मुंबई महापालिकेचे क्रिकेट प्रशिक्षक विकास साटम, अजेय सिंघम, सचिन सुर्यवंशी उपस्थित होते. तत्पूर्वी महापालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी जेमिमाचे स्वागत केले. दरम्यान, सरावाच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार संदीप नाईक आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव शहाअलम शेख यांनी जेमिमाह रॉड्रिग्ज हिची भेट घेवून आशिया कप स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.