भारतीय महिला संघातील महत्त्वाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स ( Jemimah Rodrigues) सलग तिसऱ्या वर्षी द हंड्रेड लीगमध्ये खेळणार आहे आणि यंदा ती नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाचा भाग असेल. दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियन अष्टपैलू हीदर ग्रॅमच्या जागी तिची निवड करण्यात आली आहे. याच संघात जखमी ऑस्ट्रेलियन फलंदाज एलिसा हिलीच्या जागी युवा डावखुरी फलंदाज फोबी लिचफिल्डला संधी दिली गेली आहे.
नुकत्याच झालेल्या ऍशेस मालिकेदरम्यान लिचफिल्डने जखमी हिलीच्या जागी यष्टीरक्षण केले होते. ऑस्ट्रेलियाची आणखी एक अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी हिनेही स्पर्धेतून माघार घेतली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. ती बर्मिंगहॅम फिनिक्स संघाचा भाग होती, परंतु तिच्या बदलीची घोषणा केलेली नाही.
२२ वर्षीय जेमिमा हंड्रेडच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू होती, परंतु मनगटाच्या दुखापतीमुळे तिला दुसऱ्या वर्षी माघार घ्यावी लागली होती. तिला यावर्षी सुपरचार्जर्सने कायम ठेवले नाही, परंतु आता बदली खेळाडू म्हणून संघात परत घेतले आहे. जेमिमाशिवाय ऋचा घोष (लंडन स्पिरिट), हरमनप्रीत कौर (ट्रेंट रॉकेट्स) आणि स्मृती मानधना (सदर्न ब्रेव्ह) याही स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
जेमिमा म्हणाली, "द हंड्रेडमध्ये परत येण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. ही जागतिक दर्जाची स्पर्धा आहे आणि मी याआधीही त्यात सहभागी झाले आहे. दुखापतीमुळे गेल्या वर्षी या स्पर्धेला मुकावे लागल्याने मी खूप निराश होते. त्यामुळे पुन्हा परत येणे खूप छान आहे. हेडिंग्ले हे खेळण्यासाठी एक उत्तम मैदान आहे आणि चाहते विलक्षण आहेत. मी परत येण्याची वाट पाहू शकत नाही." २२ वर्षीय जेमिमाने २४ वन डे सामन्यांत ५२३ आणि ८३ ट्वेंटी-२० सामन्यांत १७५१ धावा केल्या आहेत.