इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या दी हंड्रेड या नव्या फॉरमॅटमध्ये महिला क्रिकेटपटू धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहेत. एकाच वेळी महिला व पुरुषांसाठी ही लीग खेळवण्यात येत आहे, महिला लीगमध्ये भारताच्या स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा व जेमिमा रॉड्रिग्ज यांनी सहभाग घेतला आहे. जेमिमा नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि तिनं पहिल्याच सामन्यात नाबाद 92 धावांची वादळी खेळी केली व संघाला वेल्श फायर संघावर सहज विजय मिळवून दिला.
लीड्सच्या हेडिंग्ले येथे शनिवारी झालेल्या या सामन्यात वेल्श फायर संघानं प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूंत 8 बाद 130 धावा केल्या. हेली मॅथ्यूजनं सर्वाधिक 30 धाव केल्या, तर सुपरचार्जर्सच्या लिंसी स्मिथनं 20 चेंडूंत 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात सुपरचार्जर्सची सुरुवात निराशाजनक झाली आणि त्यांचे 4 फलंदाज 18 चेंडूंत 19 धावांवर माघारी परतले. पण, जेमिमा फटकेबाजीच्या मुडमध्येच आलेली दिसली. तिनं दडपण झुगारून जोरदार फटकेबाजी केली. तिनं 26 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले.
त्यानंतर तिनं आक्रमक खेळ कायम राखला. तिनं पुढील 17 चेंडूंत 8 खणखणीत चौकार खेचले आणि 43 चेंडूंत नाबाद 92 धावा कुटल्या. या लीगमधील महिला व पुरुष यांच्यातील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. सुपरचार्जर्सनं 85 चेंडूंत 6 विकेट्स राखून हा सामना जिंकला. जेमिनानं चौकार व षटकारानं 18 चेंडूंत 74 धावा कुटल्या. तिनं पाचव्या विकेटसाठी एलिस डेव्हिडसन रिचर्ड्ससोबत नाबाद 112 धावांची भागीदारी केली.