झारखंड संघानं गुरुवारी रणजी करंडक स्पर्धेत इतिहास रचला. रणजी करंडक स्पर्धेची सर्वाधिक 41 जेतेपद नावावर असणाऱ्या मुंबई संगाला ही कामगिरी करता आलेली नाही. झारखंड संघानं 2001च्या कोलकाता ऐतिहासिक कसोटी विजयाचा कित्ता गिरवताना रणजी स्पर्धेत विक्रमाला गवसणी घातली. त्रिपुरा विरुद्धच्या या सामन्यात झारखंडनं 54 धावांनी विजय मिळवला. कर्णधार सौरभ तिवारी आणि इशांक जग्गी यांच्या शतकी खेळीनं हा विक्रम झाला.
प्रथम फलंदाजी करताना त्रिपुरा संघानं पहिल्या डावात 289 धावा केल्या. प्रत्युत्तरात झारखंडला पहिला डाव 136 धावांत गडगडला आणि त्यांच्यावर फॉलो ऑनची नामुष्की ओढावली. झारखंडकडून पहिल्या डावात विराट सिंग ( 47) आणि विवेकानंद तिवारी ( 30) यांनी संघर्ष केला. दुसऱ्या डावातही झारखंडची सुरुवात फार चांगली झाली नाही. झारखंडचे पाच फलंदाज 138 धावांत तंबूत परतले होते. सौरभ तिवारी आणि इशांक जग्गी यांनी संघाचा डाव सावरला. सौरभनं 190 चेंडूंत 8 चौकारांसह नाबाद 122 धावा केल्या, तर इशांकनं 207 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 107 धावा केल्या. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर झारखंडनं दुसा डाव 8 बाद 418 धावांवर घोषित केला.
झारखंडनं ठेवलेल्या 266 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिपुराची दमछाक झाली. मणीशंकर मुरासिंग याच्या शतकी खेळीनंतरही त्रिपुराला विजय मिळवता आला नाही. त्यानं 145 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकार खेचून 103 धावा केल्या. पण, त्रिपुराला 54 धावांनी सामना गमवावा लागला. त्यांचा दुसरा डाव 211 धावांत गुंडाळण्यात झारखंडच्या गोलंदाजांना यश आलं. आशिष कुमारनं पाच विकेट्स घेतल्या, त्याला विवेकानंद तिवारीनं तीन, तर अजय यादवनं दोन विकेट घेत चांगली साथ दिली. पहिल्या डावात फॉलोऑन पत्करूनही विजय मिळवणारा झारखंड हा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच संघ ठरला.