Shahbaz Nadeem has announced his retirement - प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक बळी घेणारा अनुभवी डावखुरा गोलंदाज शाहबाज नदीम याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे म्हटले आहे. नदीमने या रणजी मोसमात राजस्थानविरुद्ध शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. निवृत्तीनंतर तो जगभरातील वेगवेगळ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये सहभागी होण्याचा विचार करत आहे.
Espncricinfoशी बोलताना नदीम म्हणाला, "मी माझ्या निवृत्तीच्या निर्णयावर बराच काळ विचार करत होतो आणि आता मी तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला माहित आहे की मला भारतीय संघात संधी मिळणार नाही तेव्हा मी तरुण क्रिकेटपटूंना संधी देणे चांगले आहे. आता मी जगभरातील ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळण्याचा विचार करत आहे.
नदीमने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले. त्याने ऑक्टोबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे पदार्पण सामना खेळला होता. जिथे त्याने चार विकेट घेतल्या. यानंतर त्याला २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध सामना खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांसह एकूण ७२ सामने खेळले .
नदीम म्हणाला,"कोणताही निर्णय खूप भावनिक होऊन घेऊ नये, असे मला नेहमीच वाटते. मी झारखंड संघासोबत २० वर्षांपासून खेळत आहे. जरी आम्हाला रणजी ट्रॉफी जिंकता आली नसली तरी आम्ही एक मजबूत संघ बनवला आहे. आज देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडच्या संघाला कोणीही हलक्यात घेत नाही. मला विश्वास आहे की युवा खेळाडू भविष्यात आमच्या संघासाठी मोठी ट्रॉफी जिंकेल."
नदीम २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये आघाडीवर विकेट घेणारा गोलंदाज होता. तो २०१८ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने राजस्थानविरुद्ध अवघ्या १० धावांत आठ विकेट घेत विश्वविक्रम केला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एका डावात आतापर्यंतची ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. २०१३ ते २०२० पर्यंत भारत अ संघाकडून खेळताना त्याने सर्वाधिक ८३ विकेट्स घेतल्या. रणजी करंडक स्पर्धेत तो सर्वाधिक बळी घेणारा आठवा गोलंदाज आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १४०सामन्यांमध्ये २८.८६ च्या सरासरीने एकूण ५४२ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १७५ आणि ट्वेंटी-२० मध्ये १२५ विकेट आहेत.