Jhulan Goswami, IND vs BAN, Women's World Cup 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाने आज कर्णधार मिताली राज हिच्या नेतृत्वाखाली बांगलादेश विरूद्ध झालेल्या वर्ल्ड कप सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २२९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव ११९ धावांवरच आटोपला. त्यामुळे टीम इंडियाने ११० धावांनी तगडा विजय मिळवत सेमीफायनसाठीचे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं. भारताची सर्वात अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी हिने गेल्या दोन सामन्यात दोन मोठे विक्रम केले होते. त्यानंतर आजच्या सामन्यात तिने विक्रमांची हॅटट्रिक केली.
भारतीय संघानेे प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून पहिल्या सहा फलंदाजांनी प्रत्येकी २५पेक्षा जास्त धावा केल्या. असं वन डे क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी पहिल्यांदाच घडलं. भारताच्या यास्तिका भाटियाने दमदार अर्धशतक ठोकलं. पण स्मृती मानधना आणि इतर खेळाडूंना चांगली सुरूवात मिळाली पण त्यांना मोठी खेळी उभारता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव २२९ धावांत संपला. बांगलादेशच्या रितू मोनीने ३७ धावांत सर्वाधिक ३ बळी टिपले.
त्यानंतर बांगलादेशचा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला. या सामन्यात झुलन गोस्वामीने पहिला चेंडू टाकताच तिने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. महिलांच्या वन डे क्रिकेटच्या इतिहासात २०० डावांमध्ये गोलंदाजी करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. या यादीत दुसरी असलेली जेनी गन हिने केवळ १३६ डावांमध्ये गोलंदाजी केली आहे.
दरम्यान, २३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाने झटपट विकेट्स गमावल्या. स्नेह राणाने ३० धावांत ४, झुलन गोस्वामीने १९ धावांत २ तर पूजा वस्त्रकारने २६ धावांत २ बळी घेत बांगलादेशच्या संघाचं कंबरडं मोडलं. बांगलादेशकडून अनुभवी सलमा खातून हिने सर्वाधिक ३२ धावा केल्या.
Web Title: Jhulan Goswami became first ever player to bowl in 200 Womens ODI innings india vs bangladesh womens world cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.