भारतीय क्रिकेट विश्वास असा प्रसंग कधीच घडला नसावा... जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशननं ( JKCA) टीम इंडियाचा खेळाडू परवेझ रसूल याच्यावर खेळपट्टीचा रोलर चोरी केल्याचा आरोप केला आहे. JKCA नं नोटिस पाठवून अष्टपैलू खेळाडूला रोलर परत करण्यास सांगितले आहे. भारतीय खेळाडूनं JKCAच्या नोटिसीला उत्तर दिले असून ही दुर्दैवी घटना असल्याचे मत व्यक्त केले आहे.
Video : जेम्स अँडरसनने जेव्हा आर अश्विनच्या फोटोचे तुकडे केले होते; तेव्हा कुठे गेली होती खिलाडूवृत्ती?
परवेझ रसूल हा जम्मू-काश्मीर मधील प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्यानं टीम इंडियाकडून एक वन डे व एक ट्वेंटी-२० सामना खेळला आहे. पण, या आरोपामुळे त्याच्या इभ्रतीला धक्का बसला आहे. रोलर परत न केल्यास पोलिसांची मदत घेतली जाईल असे मत JKCAनं स्पष्ट केले आहे. Indian Expressशी बोलताना हे आरोप फेटाळून लावले. तो म्हणाला, जम्मू काश्मीर क्रिकेटसाठी आयुष्य पणाला लावले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला अशी वागणुक देण्याची ही पद्धत आहे का?''
बीजेपी प्रवक्ता निवृत्त ब्रिगेडियर अनील गुप्ता यांनी याबाबत JKCAला मेल करून पुरावे मागितले आहेत. त्यांनी रसूललाही हा मेल टॅग केला आहे. त्यावर रसूलनं उत्तर दिले की,''तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी परवेझ रसूल हा जम्मू काश्मीरमधील पहिला खेळाडू आहे की ज्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल, दुलिप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, भारत अ, अध्यक्षीय एकादश, इरानी ट्रॉफी आदी स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. मागील सहा वर्षांपासून मी जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार आहे. बीसीसीआयनं दोनवेळा मला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविले आहे. आज माझ्यावर रोलर चोरीचा आरोप झाला, हे दुर्दैवी आहे.'''
'मी हे स्पष्ट सांगू इच्छितो की मी रोलर किंवा मशीन घेतलेली नाही. मी खेळाडू आहे आणि क्रिकेट खेळणे माझे काम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला अशी वागणूक दिली जाते का, हा सवाल मला विचारायचा आहे. तुम्ही संलग्न जिल्हा संघटनांकडे रोलरबाबत विचारणा करायला हवी, माझ्याकडे नाही,''असेही रसूलनं स्पष्ट केले.