दुबई : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करत खोऱ्याने धावा काढलेल्या इंग्लंडचा कर्णधार जो रुट याची आयसीसीच्या ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार पटकावताना रुटने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी यांना मागे टाकले. महिलांमध्ये आयर्लंडची अष्टपैलू एमियर रिचर्डसन हिने पुरस्कार पटकावला.
रुटने ऑगस्ट महिन्यात भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांत मिळून ५०७ धावा काढल्या. यावेळी त्याने तीन दमदार शतकी खेळीही केल्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती.
आयसीसीच्या वोटिंग अकादमीमध्ये सहभागी असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जेपी ड्युमिनी म्हणाला की, ‘कर्णधार म्हणून अपेक्षा आणि जबाबदारी सांभाळत रुटने फलंदाजीत दमदार कामगिरीसह नेतृत्त्व केले आणि जगातील अव्वल फलंदाज ठरला. रुटची ही कामगिरी प्रभावित करणारी आहे.’ महिलांमध्ये एमियरने आपल्याच देशाच्या गॅबी लुईस आणि थायलंडच्या नताया बूचेथम यांना मागे टाकले. मागील महिन्यात झालेल्या टी-२० विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेत एमियरने शानदार कामगिरी केली. या जोरावर तिला मालिकावीर म्हणूनही घोषित करण्यात आले होते.