ॲडलेड : ॲशेस मालिकेत पहिले दोन कसोटी सामने एकतर्फी पद्धतीने गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट अत्यंत निराश झाला असून त्याने आपल्या प्रतिक्रियेतून संघाच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘मालिकेत पुनरागमन करण्यासाठी संघाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात कामगिरी उंचवावी लागेल,’ असे रूटने म्हटले.
ॲडलेड येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७५ धावांनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या दारुण पराभवानंतर रूट म्हणाला की, 'चेंडू योग्य दिशेने टाकणे, मोठ्या खेळी साकारणे आणि बळी मिळवण्याच्या संधी निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ड्रेसिंग रूममध्ये सर्वजण निराश आहेत. आम्ही आमचा नैसर्गिक खेळ करण्यात अपयशी ठरत असून आम्हाला लवकरच कामगिरीत सुधारणा करावी लागेल. पुढील सामना मेलबर्न येथे होणार असून येथे विजय मिळवण्याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरू.'इंग्लंड संघाला २०१०-११ सालानंतर ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या अखेरच्या दोन ॲशेस मालिकांमध्ये इंग्लंडचा अनुक्रमे ०-५ आणि ०-४ असा पराभव झालेला आहे.
रूटच्या नेतृत्वावर पाँटिंगला शंका!
'आखलेल्या योजनेनुसार मैदानावर संघाची कामगिरी करून घेण्याची जबाबदारी कर्णधार म्हणून जो रूटची आहे. मात्र, गेल्या दोन सामन्यांत यामध्ये तो सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे,' असे सांगत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने इंग्लंडचा कर्णधार रूटच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे. ॲडलेड येथील दुसऱ्या कसोटीत झालेल्या मोठ्या पराभवाची खापर रूटने गोलंदाजांच्या सुमार कामगिरीवर फोडले. यावर पाँटिंगने रूटवर टीका केली.
पाँटिंग म्हणाला की, 'रूटने पराभवास गोलंदाजांना जबाबदार धरल्याचे ऐकून आश्चर्य वाटले. गोलंदाजांना बदल करण्याबाबत सांगण्याचे काम कोणाचे आहे? असे असेल, तर तुम्ही कर्णधार का आहात? जर तुम्ही तुमच्या गोलंदाजांना योग्य लेंथवर मारा करण्यासाठी प्रेरीत करत नसाल, तर तुम्ही मैदानावर काय करत असतात?' इंग्लंडच्या पराभवासाठी रूटलाच जबाबदार धरताना पाँटिंगने पुढे म्हटले की, 'रूट आपल्या मनानुसार काहीही बोलू शकतो, पण जेव्हा तुम्ही कर्णधार असता तेव्हा तुम्हाला समजले पाहिजे की, गोलंदाजांकडून अपेक्षित मारा होत नाहीए आणि जर गोलंदाज तुमच्या म्हणण्याप्रमाणे मारा करत नसतील, तर त्यांना गोलंदाजीपासून हटवले पाहिजे. गोलंदाजांसोबत कर्णधाराचा चांगला संवाद झाला पाहिजे. कर्णधार म्हणून हीच जबाबदारी असते.'