इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुट सध्या एका मागून एक विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याच्या नावे आणखी एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC च्या इतिहासात नव्या पराक्रमाची नोंद करत त्याने भारताच्या आर अश्विन याला मागे टाकले आहे.
मालिकावीर ठरण्याचाही खास विक्रम
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकवण्याचा विक्रम आता जो रुटच्या नावे जमा झाला आहे. श्रीलंका विरुद्धच्या तीन सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडच्या संघाने २-१ अशी जिंकली. या मालिकेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल जो रुटला प्लेयर ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आले.
रुटचा खास 'चौका'; अश्विनला मागे टाकला
जो रुटनं श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २ शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने एकूण ३७५ धावा काढल्या. या कामगिरीसह त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात चौथ्यांदा मालिकावीर पुरस्कार पटकवला. याआधी WTC मधील सर्वाधिक वेळा मालिकावीर होण्याचा विक्रम हा अश्विनच्या नावे होता. टीम इंडियाच्या फिरकीपटूने आतापर्यंत तीन वेळा मालिकावीर होण्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे.
अश्विनशिवाय रूटनं या दोघांनाही टाकले मागे
जो रुट याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चौथ्यांदा मालिकावीर पुरस्कार पटकावत अश्विनशिवाय बेन स्टोक्स आणि केन विलियम्सन यांनाही मागे टाकले आहे. या दोघांनीही प्रत्येकी ३-३ वेळा सामनावीर पुरस्कार पटकवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक वेळा सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रुट नंबर वन आहे. त्याने ग्राहम गूच, अँड्रयू स्ट्रॉस आणि जेम्स अँडरसन यांना मागे टाकले आहे. इंग्लंडच्या या खेळाडूंनी प्रत्येकी ५-५ वेळा मालकावीर होण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.