अयाज मेमनकन्सल्टिंग एडिटर
ज्यो रुट ‘दहा हजारी’ क्लबमध्ये सहभागी झाला आहे. शतकी खेळी करत तो मॅचविनरही बनला. यामुळे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत इंग्लंड संघ १-० ने आघाडी संपादन करू शकला. त्याचवेळी रुटने समकालीन फलंदाजांच्या क्रमवारीतही खळबळ माजवून दिली. मागील दशकात रुट हा स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि विराट कोहली यांच्यापेक्षा धावा काढण्यात आणि लोकप्रियतेत मागे राहिला. ‘फॅब फोर’मध्ये मोठी स्पर्धा जाणवत होती. या काळात कोहली सर्व प्रकारात वरचढ ठरत होता. अव्वल स्थानी तोच दिसायचा. अधूनमधून स्मिथ आणि विल्यमसन यांचीही चर्चा व्हायची. रुट नेहमी धावा काढत राहिला, मात्र अव्वल स्थानावर झेप घेता येत नव्हती.२०१९च्या सुरूवातीला इतर तीन फलंदाज शतके ठोकत असताना रुट मात्र शतकासाठी संघर्ष करत होता. मागील दोन-तीन वर्षांत मात्र परिस्थिती नाट्यमयरित्या बदलली. त्याने इतर तिघांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. सुनील गावसकर यांनी खरंतर दहा हजारी क्लबला सुरूवात केल्यापासून १३ जणांची आणखी त्यात भर पडली. रुटने गेल्या आठवड्यात प्रवेश केला.
गावसकर यांनी १९८७ला पाकिस्तानविरुद्ध चौथ्या कसोटीत दहा हजार धावांचा पल्ला गाठला होता. तो सामना अनिर्णित राहिला. मात्र, माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासारख्या या अतुलनीय कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमानाने भरून आले. गावसकर यांनी तोपर्यंत कसोटीत सर्वाधिक धावा केल्या शिवाय सर्वाधिक शतकेही ठोकली होती. मात्र, दहा हजार धावांचा टप्पा गाठणे भारतीय क्रिकेटसाठी ‘नवी भरारी’ होती.
गावसकर यांच्यानंतर ज्यांनी ही कामगिरी केली त्यात सचिनच्या १५,९२१ धावा आहेत. तज्ज्ञांच्या मते सचिनच्या विक्रमाला रुटकडूनच धोका आहे. याशिवाय कोहली, विल्यमसन, स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा हे जबरदस्त धावा काढणारे शर्यतीत असतील. त्याचवेळी फॉर्ममध्ये असलेला बाबर आझम याच्याकडेही गंभीरपणे पाहिले जाते. त्यासाठी त्याला आणखी दोन-तीन वर्षे धावांचा पाऊस पाडत राहावे लागेल.
विशेष म्हणजे रुटच्या पुढे असलेल्या फॅब फोरमधील तिघांना अनपेक्षितपणे घसरणीचा अनुभव घ्यावा लागला. २०१९ मध्ये निलंबन मागे होताच स्मिथ फार काही झंझावात दाखवू शकला नाही. विल्यमसन हा न्यूझीलंडचा आधारस्तंभ.
चौथ्या डावात शानदार खेळी करीत त्याने भारताविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनल जिंकून दिले. पण गेल्या वर्षभरात दुखापती आणि खराब फॉर्ममुळे त्रस्त राहिला. स्वत:च्या छायेतच तो दबून गेला. विराट कोहलीच्या फॉर्ममधील घसरण ही सर्वात आश्चर्यकारक बाब ठरली. सहजपणे धावा काढणाऱ्या कोहलीला २०१९ च्या अखेरपासून एकेक धाव घेणे अवघड गेले.- जगभरात कोविड महामारी पसरली आणि रुटचा उदय झाला. एकीकडे बायोबबलचे भय खेळाडूंच्या चिंतेत भर घालत असताना, रुट मात्र निर्दोषपणे खेळत आहे. एकट्या २०२१ मध्ये त्याने सहा शतकासह १७०८ धावा केल्या आहेत. २०१९ पर्यंत कोहली, स्मिथ, विल्यमसन हे आघाडीवर होते, आज रुट नंबर वन बनला. पाठोपाठ स्मिथ आणि विल्यमसन आहेत. कोहलीची चौथ्या स्थानी घसरण झाली. ही रँकिंग झपाट्याने बदलूही शकेल. कारण स्मिथ, विल्यमसन आणि कोहली हे रुटला मागे टाकण्यास स्वत:पुढील आव्हान पेलतील का? हे पाहावे लागेल...