Joe Root magic with bat, Viral Video: इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट याने आपल्या जादुई फलंदाजीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या डावातील शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडनेन्यूझीलंडवर ५ गडी राखून विजय मिळवला आणि १-०ने मालिकेत आघाडी घेतली. जो रूटने रविवारी इतिहास रचला. न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात जो रूटने आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पाही गाठला. अशी कामगिरी करणारा जो रूट हा इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला. मात्र, सध्या जो रूटने केलेल्या खऱ्याखुऱ्या जादुची जास्त चर्चा रंगली आहे.
जो रूट फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईकवर उभा होता. त्यावेळी तो १४४ चेंडूत ८७ धावांवर होता. न्यूझीलंडचा कायल जेमिसन गोलंदाजीसाठी धावत आला. त्यावेळी साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण जेमिसन गोलंदाजी करण्यासाठी क्रीजजवळ पोहोचताच रूटने बॅट हातात घेतली. पण त्याआधी काही वेळ बॅट कशाचाही आधार न घेता मैदानावर नीट उभी होती. हे रूटने नक्की कसे केले? याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, लॉर्ड्सवरील सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठरला तो जो रूटचा विक्रम. कारण जो रूटकडून कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर हा त्याचा पहिलाच कसोटी सामना होता. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील पहिल्याच कसोटीत रूटने हा विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारा जो रूट हा केवळ ३१ वर्ष १५७ दिवसांचा आहे. विशेष बाब म्हणजे इंग्लंडसाठी पहिल्या दहा हजार कसोटी धावा करणाऱ्या अॅलिस्टर कुकने देखील वयाच्या ३१ वर्षे १५७ दिवसांतच हा विक्रम आपल्या नावावर केला होता. रूटने त्याचीच पुनरावृत्ती केली.