Joe Root Test Captaincy: इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूट याने शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. त्याने इंग्लंड संघाचे कसोटी कर्णधारपद सोडले. २०१७ पासून इंग्लंडच्या संघाचे कर्णधारपद रूट सांभाळत होता. अॅलिस्टर कूकनंतर त्याला ही जबाबदारी देण्यात आली होती. त्याने ती जबाबदारी समर्थपणे पेलली. पण गेल्या वर्षी मात्र रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला अॅशेस मालिकेत ०-४ अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर रूटवर प्रचंड टीका होत होती. तशातच त्याने आज हा निर्णय घेतला.
अॅशेस मालिकेनंतर इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. तिथे इंग्लंडचा संघ दमदार पुनरागमन करेल, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. पण तेथेही संघाला ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला. शिवाय अॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळली. त्यात भारतीय संघाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर २-१ अशी आघाडी घेतली होती. या साऱ्या घटनांचा विचार करता जो रूटने पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
--
रूट कर्णधार असताना इंग्लंडने जिंकले ६४ पैकी २७ कसोटी सामने
जो रूटने २०१७ पासून आतापर्यंत ६४ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व केले. त्यात इंग्लंडने २७ सामने जिंकले तर २६ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या दरम्यान संघाची विजयाची टक्केवारी ४२.१८ इतकी होती. कर्णधार म्हणून जो रूटनेही ४७ च्या सरासरीने ५ हजार २९५ धावा केल्या. कसोटी कर्णधार असताना त्याने १४ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली.