Join us  

"मुंबईच्या हवेत श्वास घ्यायलाही त्रास होतो, असं वाटतं की..", इंग्लंडच्या स्टार खेळाडूचं अजब विधान

आफ्रिकेविरूद्ध दारूण पराभवानंतर हवा प्रदुषणावर फोडलं खापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 4:41 PM

Open in App

Joe Root England Mumbai Air : भारतात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडचा 229 धावांनी पराभव झाला. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड नंतर हा इंग्लंडचा तिसरा पराभव ठरला. या पराभवानंतर इंग्लंडचा सर्वोत्तम खेळाडू जो रूट याने पराभवाचे खापर मुंबईच्या हवामानावर फोडले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान रूटने खेळाडूंना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचा दावा रूटने केला आहे.

बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत जो रुट म्हणाला, “मी यापूर्वी कधीही अशा परिस्थितीत खेळलो नाही. मी साहजिकच यापेक्षा जास्त उष्ण परिस्थितीत खेळलो आहे आणि कदाचित यापेक्षा जास्त दमट परिस्थितीतही खेळलो आहे. पण आपण श्वास घेऊ शकत नाही असे त्यावेळी वाटले होते. श्वास घेताना वाटत होते की आपण हवा घेत नसून हवा खात आहात. ते फिलिंग फार विचित्र होते," अशा शब्दांत त्याने रूटने टीकास्त्र सोडले.

जो रूट पुढे म्हणाला, “तुम्ही हेनरिक क्लासेनबाबत जे घडलं ते पाहू शकता. त्यावेळी वातावरण किती दमट होते ते तुम्ही पाहू शकता. कारण फलंदाजी करूनही नंतर तो मैदानात परतू शकला नाही,” असे उदाहरणही त्याने दिले.

वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात आफ्रिकन संघाने सात विकेट गमावून 399 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने पाठलाग करताना केवळ 229 धावा केल्या. आता World Cup 2023 चा एक महत्त्वाचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात 29 ऑक्टोबर रोजी लखनौच्या एकाना स्टेडियमवर होणार आहे. अशा स्थितीत या सामन्यापूर्वी रूटचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपजो रूटमुंबईवायू प्रदूषण