गॉल : इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने उपखंडात फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्यास सज्ज असल्याचे आणखी एक चांगले उदाहरण सादर केले. रविवारी त्याने शतकी खेळी करीत भारताविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी सज्ज असल्याचा इशारा दिला. लेसिथ एम्बुलडेनियाने ७ बळी घेत दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या यजमान श्रीलंकेच्या आशा कायम राखल्या. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ९ बाद ३३९ धावांची मजल मारली होती. त्यावेळी इंग्लंड संघ श्रीलंकेच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या तुलनेत ४२ धावांनी पिछाडीवर होता. श्रीलंकेने पहिल्या डावात ३८१ धावा केल्या आहेत.
पहिल्या कसोटीत २२८ धावांची खेळी करणारा रूट अखेरच्या क्षणी धावबाद झाल्यामुळे सलग दुसरे द्विशतक झळकावण्यापासून वंचित राहिला, पण त्याची १८६ धावांची खेळी इंग्लंडच्या पहिल्या डावाचे ठळक वैशिष्ट्य ठरली. त्याने ३०९ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार लगावले. रूट बाद झाल्यानंतर रविवारी खेळ संपल्याची घोषणा करण्यात आली. डावखुरा फिरकीपटू एम्बुलडेनियाने १३२ धावांच्या मोबदल्यात ७ बळी घेतले. त्याने एका टोकाकडून गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली आणि रूटचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
रूटने आपले १९वे कसोटी शतक झळकावले. त्याने जॉनी बेयरस्टोसोबत (२८) तिसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. रूटने त्यानंतर जोस बटलर (५५) सोबत पाचव्या विकेटसाठी ९७ धावांची आणि डॉम बेससोबत (३२) आठव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेतर्फे एम्बुलडेनिया व्यतिरिक्त आपला पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या रमेश मेंडिसने यश मिळवले. त्याने बटलरच्या रूपाने आपला पहिला कसोटी बळी घेतला.
संक्षिप्त धावफलकश्रीलंका पहिला डाव : १३९.३ षटकांत सर्व बाद ३८१ धावा (लाहिरु तिरिमाने ४३, अँजेलो मॅथ्यूज ११०, दिनेश चंडीमल ५२, निरोशन डिकवेला ९२, दिलरुवान परेरा ६७) गोलंदाजी : जेम्स ॲन्डरसन ६/४०, सॅम कुरेन १/६०, मार्कवूड ३/८४.इंग्लंड पहिला डाव : ११४.४ षटकात ९ बाद ३३९ धावा. (जोस बटलर ५५, डॉमनिक बेस ३२, जॉनी बेयरेस्टो २८, ज्यो रुट १८६, ) गोलंदाजी : लसिथ एम्बुलडेनिया ७/१३२, रमेश मेंडिस १-४८)