Join us  

ज्यो रूट इंग्लंडचे फलंदाजीतील सर्व विक्रम मोडेल : नासिर हुसेन

फिरकीला समर्थपणे तोंड देणाऱ्या महान खेळाडूंपैकी एक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 4:27 AM

Open in App

लंडन : ‘इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट हा फिरकीचा यशस्वी सामना करणारा देशाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू असून, आतापर्यंत आमच्या फलंदाजांनी नोंदविलेले सर्व विक्रम  तो मोडीत काढेल,’ असे भाकित माजी कर्णधार नासिर हुसेन याने बुधवारी केले. रूटने चेन्नई कसोटीत भारताविरुद्ध पहिल्या डावात २१८ धावांची दमदार खेळी केली होती. स्काय स्पोर्ट्‌ससाठी लिहिलेल्या स्तंभात नासिर म्हणाला, ‘रूट हा इंग्लंडचा महान खेळाडूंपैकी एक आहे. तो शक्यतो सर्वच विक्रम मोडेल. सर ॲलिस्टर कुकच्या १६१ कसोटी सामन्यांनादेखील तो मागे टाकेल. कुकच्या धावादेखील तो मागे टाकू शकतो. रूट केवळ ३० वर्षांचा आहे. सध्या तो शानदार फॉर्ममध्येदेखील आहे. इंग्लंडच्या महान खेळाडूंची यादी तयार केल्यास कुक, ग्रॅहम गुच आणि केव्हिन पीटरसनसोबतच रूटदेखील असेल.’ ‘माझ्या मते रूट हा फिरकीला समर्थपणे तोंड देणारा इंग्लंडचा सर्वकालीन महान खेळाडू ठरतो. त्यला स्विप मारताना पाहणे फारच शानदार ठरते. भारताविरुद्ध त्यांच्या खेळपट्टीवर मोठा विजय ही ‘परफेक्ट कामगिरी’ आहे. इंग्लंडचा हा सर्वाेत्कृष्ट कसोटी विजय ठरला. जाणकारांनी इंग्लंडला कमकुवत मानले होते. भारत ४-० ने जिंकेल, असे अनेकांचे वक्तव्य होते. कुणीही या संघाला अधिक संधी दिली नव्हती. भारताने ऑस्ट्रेलियात मालिका विजय साजरा केला. विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले. भारतात आयोजित कसोटी सामना जिंकणे फारच कठीण असते. इतक्या सर्व आव्हानांवर मात करीत रूटने नेतृत्वाची चमक दाखवली,’ असे हुसेनने म्हटले आहे.विदेशात जिंकून दिले सहा सामने इंग्लंडचा हा विजय अव्वल स्थानावर असायला हवा. विदेशात मिळालेला हा मोठा विजय आहे. आमच्या खेळाडूंनी शंभर टक्के कामगिरी केली. पहिल्यापासून अखेरच्या चेंडूपर्यंत इंग्लंडचे खेळाडू वर्चस्व गाजविताना दिसले. इंग्लंडच्या कामगिरीत फार सुधारणा झालेली पाहायला मिळाली. विदेशात या संघाने सलग सहा सामने जिंकले. जेम्स ॲन्डरसनने पाचव्यादिवशी शानदार मारा करीत विजयाची कोनशिला ठेवली.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूट