‘फॅब फोर’मध्ये ज्यो रूट, विल्यमसन शिखरावर, २०२० नंतर विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ कसोटीत माघारले

International Cricket : फॅब फोरच्या कामगिरीवर ‘इएसपीएन क्रिक इन्फो’ने रंजक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. लोकमतने आपल्या वाचकांसाठी ती उपलब्ध करून दिली असून त्यावर एक नजर टाकू या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 02:19 PM2024-09-05T14:19:00+5:302024-09-05T14:19:32+5:30

whatsapp join usJoin us
Joe Root, Williamson at peak in 'Fab Four', Virat Kohli, Steve Smith retire from Tests after 2020 | ‘फॅब फोर’मध्ये ज्यो रूट, विल्यमसन शिखरावर, २०२० नंतर विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ कसोटीत माघारले

‘फॅब फोर’मध्ये ज्यो रूट, विल्यमसन शिखरावर, २०२० नंतर विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ कसोटीत माघारले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

३१ ऑगस्ट २०१४ रोजी, न्यूझीलंडचे माजी दिग्गज मार्टिन क्रो यांनी क्रिकेटमध्ये  'फॅब फोर' हा शब्दप्रयोग केला. त्यांच्यानुसार आधुनिक युगातील अव्वल चार कसोटी फलंदाज विराट कोहली, ज्यो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन या स्टार खेळाडूंचा समावेश होतो. २०१० नंतर कसोटी क्रिकेटमध्ये ‘फॅब फोर’चा वरचष्मा होता. त्याची साक्ष ही आकडेवारी देते. रूट, विल्यमसन, स्मिथ आणि कोहली यांनी २०१४-१९ या कालावधीत ५० च्या वर सरासरीने धावा केल्या. सर्वांनी ४० च्या वर कसोटी सामने खेळले. आता पाच वर्षांनंतरचे चित्र वेगळे आहे. विल्यमसन आणि रूट उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. रूटने लंकेविरुद्ध एका सामन्यात दोन शतके झळकावली. विराट आणि स्मिथ मात्र फॉर्मसाठी झगडत आहेत. ज्यो रूट याने मागच्या आठवड्यात जितकी शतके ठोकली, तितकी शतके विराट कोहलीने २०२०-२४ या चार वर्षांत नोंदविली. फॅब फोरच्या कामगिरीवर ‘इएसपीएन क्रिक इन्फो’ने रंजक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. लोकमतने आपल्या वाचकांसाठी ती उपलब्ध करून दिली असून त्यावर एक नजर टाकू या...

फलंदाजी सरासरी (मागील पाच वर्षांतील तफावत) 
२०१४ ते २०१९ या पाच वर्षांत फॅब फोरच्या चढाओढीत एकमेव वेगळा फलंदाज होता तो डेव्हिड वॉर्नर! स्टीव्ह स्मिथ याने ५६ कसोटींत अप्रतिम २४ शतके ठोकली. विल्यमसन आणि कोहली तुलनेत मागे होते तर रूट तितकासा वेगवान नव्हता. त्याची सरासरी मात्र ५० हून अधिक होती.

चार वर्षांत चित्र पालटले
२०२० नंतर चित्र अचानक बदलले. विल्यसमन आणि रूट यांनी फॉर्म केवळ कायम राखला नाही तर त्यात सुधारणाही केली. जो स्मिथ शिखरावर होता, तो जमिनीवर आला. कोहलीच्या फॉर्ममध्ये तर सातत्याने घसरण झाली. २०२० पासून आतापर्यंत २४ फलंदाजांनी किमान १६०० धावा काढल्या. त्यात झॅक क्रॉलीची सरासरी ३३.५९ इतकी आहे. दुसरीकडे विल्यमसनची सरासरी कोहलीच्या तुलनेत दुपटीहून अधिक ठरली. 

कारकिर्दीतील घसरण...
सततच्या अपयशामुळे कोहली आणि स्मिथ यांची कारकिर्दीत मोठी घसरण झाली. कोहलीची सरासरी ऑक्टोबर २०१९ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीपर्यंत ८१ सामन्यांत ५५.१० अशी होती, ती आता ४९.१५ अशी घसरली. फॅब फोरमध्ये इतकी घसरण झालेला तो एकमेव फलंदाज! स्टीव्ह स्मिथची सरासरी  ६४.८१ अशी होती, ती १०९ सामन्यांनंंतर आता ५६.९७ इतकी झाली. तरी स्मिथ फायद्यात आहे.

रूटची कारकिर्दीतील सरासरी उलट दिशेने जात आहे.  नोव्हेंबर २०१९ ला रूटची सरासरी ४७.३५ अशी होती. सध्या ती ५०.९३ इतकी झाली. विल्यमसनची सरासरी २०१९ ला ५१.४४ अशी होती, ती आता ५४.९८ अशी झाली आहे. कोहली २०१९ ते २०२३ या कालावधीत २८ कसोटी खेळला. त्याने ३०.९७च्या सरासरीने धावा केल्या. २०२२-२३ ला १४ डावांमध्ये त्याने २०.६१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

रुटची मागच्या पाच वर्षांत सरासरी ४० च्या खाली घसरलेली नाही. २०२०-२२ मध्ये २४ कसोटींत त्याने ५२.३१ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत.  विल्यमसनने याच कालावधीत २७ कसोटी सामने खेळले. त्यापैकी ऑगस्ट २०१९ ला एकदाच सरासरी ५० हून कमी होती.

संघाच्या धावांमध्ये योगदान
संघाच्या एकूण धावांच्या टक्केवारीत स्मिथ आणि कोहली यांचे योगदान क्रमश: १९.४ आणि १६.७ टक्के असायचे, ते आता १२.९ आणि १२.५ टक्क्यांवर आले आहे. 


 

वेगवान मारा-फिरकीविरुद्ध कामगिरी...
२०१४-१९ या कालावधीत फॅब फोर वेगवान आणि फिरकी माऱ्याविरुद्ध उत्कृष्ट खेळले. रूटची सरासरी वेगवान गोलंदाजांविरुद्ध ४७.४८ आणि अन्य तिघांची ५० हून अधिक होती. स्मिथने वेगवान गोलंदाजांविरुद्ध ८२.१५च्या सरासरीने धावा काढल्या, तर विल्यमसनने ८६.०१ आणि कोहलीने ७७.०३ च्या सरासरीने फिरकी गोलंदाजांना निष्प्रभ केले. २०२०नंतर वेगवान माऱ्याविरुद्ध स्मिथने ४०.४१ च्या सरासरीने धावा काढल्या. कोहली हा वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे ३० च्या सरासरीने धावा काढू शकला. विल्यमसनने दोघांविरुद्ध ६० च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

मालिकेत सर्वाेत्कृष्ट योगदान...
२०१४ ते २०१९ यादरम्यान स्मिथ १८ मालिका खेळला. त्यात सात वेळा तो प्रतिस्पर्धी संघांत सर्वाधिक धावांचा मानकरी राहिला. कोहलीने १८ मालिकांपैकी पाच मालिकांमध्ये सर्वाधिक धावा केल्या. २०२० नंतर कोहली आणि स्मिथ ११-११ मालिका खेळले, त्यात एकदाच असे घडले की, स्मिथने मालिकेत सर्वाधिक धावा ठोकल्या. द. आफ्रिकेविरुद्ध त्याने २०२१-२२ ला २३१ धावा केल्या होत्या. कोहलीने ११ मालिका खेळल्या; पण एकदाही सर्वाधिक धावा ठोकलेल्या नाहीत. विल्यमसन १२ आणि रूट १५ मालिकांपैकी चार वेळा सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज ठरले. 

ही सर्व आकडेवारी हेच दर्शविते की गेल्या पाच वर्षांत ‘फॅब फोर’ आता ‘फॅब टू’वर आले आहेत. कोहलीच्या कसोटी कामगिरीत सर्वाधिक घसरण झाली. मागच्या वर्षी त्याने काही शतके ठोकून सुधारणेचे संकेतही दिले आहेत. स्मिथ हा आधीसारखा ‘रन मशीन’ राहिलेला नाही. रूटमध्ये धावांची भूक जाणवते. विल्यमसननेदेखील कमी संधीचा पुरेपूर वापर करून घेतला. स्मिथ-कोहली यांना आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत पुन्हा चमक दाखविण्याची संधी असेल. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात २०१० सारख्या फॉर्मनुसार खेळून दोघेही धावडोंगर रचू शकतात.

Web Title: Joe Root, Williamson at peak in 'Fab Four', Virat Kohli, Steve Smith retire from Tests after 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.