मुंबई : आयपीएल आपल्या आगामी 2023च्या हंगामाकडे कूच करत आहे. अलीकडेच नव्या आयपीएल हंगामासाठी आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 2023 च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला 17.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. अलीकडेच मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा केली. सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना 100 हून अधिक प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असलेल्या अरूणकुमार जगदीशन यांची मुंबईच्या सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मागील हंगामात दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नाही. मात्र, आता इंग्रजी नववर्षाला त्याने मुंबईच्या चाहत्यांना खुशखबर देऊन आयपीएल खेळण्याचे संकेत दिले आहेत. खरं तर जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे ट्वेंटी-20 विश्वचषकाला देखील मुकला होता. त्याने नववर्षाच्या शुभेच्छा देताना 2022 मधील काही आठवणी शेअर केल्या आहेत. दुखापतीचे फोटो शेअर करताना त्याने म्हटले, "2022 धन्यवाद, 2023 मी तयार आहे", अशा आशयाचे ट्विट करत जोफ्रा आर्चरने रणशिंग फुंकले.
अरूणकुमार जगदीशन यांची प्रशिक्षकपदी निवडमुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अरूणकुमार जगदीशन यांची निवड केली आहे. त्यांनी 1993 ते 2008 अशी 16 वर्षे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी आपला मोर्चा प्रशिक्षणाकडे वळवला आणि कर्नाटकच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक पद सांभाळले. 2013-14 आणि 2014-15 मध्ये त्यांनी रणजी ट्रॉफी, इराणी चषक आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग विजेतेपद जिंकले.
आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, जसप्रीत बुमाराह , जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड, डेवॉल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमराह, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"