इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी होणाऱ्या लिलावापूर्वी १० फ्रँचायझींनी करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. मुंबई इंडियन्सने मागील दोन वर्ष केवळ संघात कायम ठेवलेल्या जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या ११ खेळाडूंपैकी ५ खेळाडू परदेशी खेळाडू आहेत. जोफ्रासह त्रित्सान स्तब्स, ड्युअन यानसेन, झाय रिचर्डसन, रिली मेरेडिथ व ख्रिस जॉर्डन या परदेशी खेळाडूंना करारमुक्त केले आहे. यापैकी काहींनी पुन्हा एकदा लिलावासाठी नोंदणी केली आहे, परंतु जोफ्रा आर्चरने आयपीएल २०२४ मधून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या तयारीसाठी हा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर येत आहे.
१९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावासाठी स्टार खेळाडूंसह एकूण ११६६ जणांनी नावे नोंदवली आहेत, परंतु जोफ्रा आर्चरचे ( Jofra Archer) नाव या यादीतून गायब आहे. ११६६ खेळाडूंमध्ये ८३० भारतीय आणि ३३६ परदेशी खेळाडू आहेत. यापैकी २१२ खेळआडू कॅप्ड आहेत, तर ९०९ अनकॅप्ड आणि ४५ संलग्न देशांतील आहेत. जोफ्रा आर्चरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ व वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. पण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी फिट राहण्याकरिता त्याला आयपीएल २०२४ मधून दूर राहण्याचा सल्ला इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) दिला आहे.
जोफ्राला अनेक कालावधीपासून दुखापत सतावतेय आणि त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकावे लागले आहे. आर्चरने ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२५ या दोन वर्षांसाठी इंग्लंड क्रिकेटच्या सेंट्रल करारावर स्वाक्षरी केली आहे. इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की म्हणाले की, या निर्णयामुळे २०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आर्चरचा वर्कलोड सांभाळणे सोपे होईल. या वर्षीच्या आयपीएल दरम्यान आर्चरच्या कोपरात दुखू लागल्याने त्याला भारतातून परतावे लागले होते. त्याला २ महिन्यांनंतर कौंटी चॅम्पियनशिप खेळायची आहे. यानंतर इंग्लंडला घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध ४ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.
आर्चरच्या फिटनेसवर आता सर्व काही अवलंबून असेल. पुढील आठवड्यापासून तो बार्बाडोसमध्ये प्रशिक्षण घेणार आहे. पण तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाचा भाग असणार नाही. आर्चरने गेल्या ५ सामन्यात फक्त २ विकेट घेतल्या आहेत.
Web Title: Jofra Archer out of IPL 2024? ECB suggests pacer to skip league for T20 World Cup 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.