जोहान्सबर्ग - तिस-या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिला डाव 187 धावात गुंडाळल्यानंतर भारतही कसोटीत पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. दुस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून दक्षिण आफ्रिकेचे दोन गडी स्वस्तात बाद झाले आहेत. पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या ६ षटकांत १ बाद ६ धावा झाल्या होत्या. दुस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर मार्करामच्या रुपाने आफ्रिकेला दुसरा धक्का बसला.
मार्करामला अवघ्या 2 धावांवर भुवनेश्वर कुमारने पार्थिव पटेलकरवी झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेचा डाव झटपट गुंडाळला तरच भारताला या कसोटीत संधी आहे. तीन कसोटी सामन्याची मालिका भारताने आधीच गमावली आहे. फक्त प्रतिष्ठा राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागेल. भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (५०) आणि कर्णधार विराट कोहली (५४) यांच्या अर्धशतकानंतरही भारतीय संघाचा तिस-या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला डाव अवघ्या १८७ धावांत संपुष्टात आला.
पुन्हा एकदा आघाडीची फळी कोसळल्यानंतर पुजारा-कोहली यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दोघेही बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोसळला. कागिसो रबाडा याने ३ बळी घेतले. वाँडरर्स स्टेडियमवर नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या वेळी, भारतीय फलंदाज गेल्या दोन सामन्यांतील चुका सुधारून मोठी धावसंख्या उभारतील अशी अपेक्षा होती. मात्र, पुजारा - कोहली यांचा अपवाद वगळता पुन्हा एकदा प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्याने भारतीय फलंदाजीमध्ये काहीही फरक पडल्याचे जाणवले नाही.