Join us  

जॉनी बेअरस्टोच्या शतकाने इंग्लंडने केले पुनरागमन

तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद २५८ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 5:35 AM

Open in App

सिडनी : जॉनी बेअरस्टो याचे शतक आणि बेन स्टोक्सच्या अर्धशतकाच्या मदतीने इंग्लंडने खराब सुरुवातीनंतरदेखील चौथ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी शुक्रवारी पुनरागमन केले. बेअरस्टो हा गेल्या सात डावांत शतक करणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज आहे. एक वेळ इंग्लंडची धावसंख्या चार बाद ३६ अशी होती. मात्र बेअरस्टो आणि स्टोक्स यांनी ही धावसंख्या सात बाद २५८ वर पोहचवली.

पॅट कमिन्स याचा चेंडू अंगठ्यावर लागल्यावर बेअरस्टोला वेदना होत होत्या. मात्र त्याने त्या सहन केल्या. एका बाजूने गडी बाद होत असतानाही तो विचलित झाला नाही. त्याने १३८ चेंडूत १२ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. आणि शतक पूर्ण झाल्यावर इंग्लंडच्या ड्रेसिंग रूमकडे पळत जात त्याने सातव्या कसोटी शतकाचा आनंद व्यक्त केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बेअरस्टो १०३ आणि जॅक लिच चार धावा करून खेळत होता. इंग्लंड अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा १५८ धावांनी मागे आहे. त्या आधी बेन स्टोक्सने ९१ चेंडूत ९ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ६६ धावा केल्या. त्याने बेअरस्टोसोबत १२८ धावांची भागीदारी करत इंग्लंडला संकटातून बाहेर काढले. नॅथन लियोनने स्टोक्सला पायचीत करत ही भागीदारी तोडली. स्टोक्सला दोन वेळा जीवदान मिळाले, तर पॅट कमिन्स त्याच्या चेंडूवर झेल घेण्यात चुकला आणि पुन्हा पायचीतवर मैदानी पंचांच्या निर्णयावर रिव्ह्यू घेतल्याने तो नाबाद ठरला.

स्टोक्स जेव्हा नऊ धावांवर होता तेव्हा कमिन्सने त्याचा रिटर्न झेल सोडला होता. त्यानंतर कॅमेरून ग्रीनने त्याला पायचीत केले होते. मात्र त्याने डीआरएस घेतला आणि तो नाबाद ठरला. जोस बटलर याला दुसऱ्यांदा खाते उघडता आले नाही. कमिन्सच्या चेंडूवर ख्वाजाने त्याचा झेल घेतला.त्यानंतर बेअरस्टो आणि वुड (३९ धावा) यांनी ७२ धावांची भागिदारी केली. वुडला कमिन्सने लियोनकरवी झेलबाद केले. 

धावफलक ऑस्ट्रेलिया पहिला डाव : १३४ षटकांत ८ बाद ४१६ धावा.इंग्लंड पहिला डाव : हसीब हमीद त्रि. गो. स्टार्क ६, झॅक क्राऊली त्रि. गो. बोलंड १८, डेव्हिड मलन झे. ख्वाजा गो. ग्रीन ३, ज्यो रुट झे. स्मिथ गो. बोलंड ०, बेन स्टोक्स पायचित गो. लियोन ६६, जॉनी बेअरस्टो खेळत आहे १०३, जोस बटलर झे. ख्वाजा गो. कमिंस ०, मार्क वूड झे. लियोन गो. कमिंस ३९, जॅक लीच खेळत आहे ४. अवांतर - १९, एकूण : ७० षटकांत ७ बाद २५८. गडी बाद क्रम - १-२२, २-३६, ३-३६, ४-३६, ५-१६४, ६-१७३, ७-२४५. गोलंदाजी : पॅट कमिंस २०-६-६८-२, मिचेल स्टार्क १४-२-४९-१, स्कॉट बोलंड १२-६-२५-२, कॅमेरुन ग्रीन ९-४-२४-१, नॅथन लियोन १२-०-७१-१, मार्नस लाबूशेन ३-०-७-०.

टॅग्स :इंग्लंड
Open in App