पुणे : सलग दुसऱ्या सामन्यात तीनशेहून अधिक धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर इंग्लंडने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कसा करावा याचा धडाच दिला. जेसन रॉय-जॉनी बेयरस्टो यांनी शतकी सलामी देत संघाच्या विजयाचा पाया रचला. यानंतर बेन स्टोक्सच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडनेभारताला ६ गड्यांनी नमवत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने लोकेश राहुलच्या शतकाच्या जोरावर ५० षटकांत ६ बाद ३३६ धावा उभारल्या. मात्र, इंग्लंडने ४३.३ षटकांमध्येच केवळ ४ फलंदाजांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केल्याने राहुलचे पाचवे एकदिवसीय शतक व्यर्थ गेले. रॉय-बेयरस्टो यांनी इंग्लंडला भक्कम सुरुवात करून देताना ११० धावांची सलामी दिली. रोहित शर्माच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे रॉय धावबाद झाला. रॉयने ५२ चेंडूंत ५५ धावा केल्या. बेयरस्टोने ११२ चेंडूंत ११ चौकार व ७ षट्कारांसह १२४ धावा कुटत भारताचा विजय हिरावला, पण सामना फिरवला तो, बेन स्टोक्सने. केवळ ५२ चेंडूंत ४ चौकार व १० षट्कारांचा पाऊस पाडत ९९ धावा चोपत त्याने बेयरस्टोसह १७५ धावांची भागीदारी करत सामन्याचा निकाल स्पष्ट केला.
त्याआधी, मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या भारताने सलग पाचव्या सामन्यात त्रिशतकी मजल मारली. कर्णधार विराट कोहली-राहुल, त्यानंतर राहुल-ॠषभ पंत यांची शतकी भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. राहुलने ११४ चेंडूंत ७ चौकार व २ षट्कारांसह १०८ धावा केल्या.
शिखर धवन व रोहित शर्मा अपयशी ठरल्यानंतर कोहली-राहुल यांनी स्थिरावण्यास वेळ घेतला. कोणताही धोका न पत्करता त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी १२१ धावांची भागीदारी केली. मात्र, भारताला तीनशे पलीकडे मजल मारुन दिली ती पंत व हार्दिक पांड्या यांनी. पुन्हा एकदा कोहली (६६) अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्यात अपयशी ठरला. पंतने ४० चेंडूंत ३ चौकार व ७ षट्कारांसह ७७ धावांचा तडाखा देत राहुलसह ११३ धावांची आक्रमक शतकी भागीदारी केली. शतक झळकावल्यानंतर राहुल बाद झाला. हार्दिक पांड्याने १६ चेंडूंत एक चौकार व ४ षट्कारांसह ३५ धावा कुटल्या. पंतनंतर हार्दिकच्या टोलेबाजीने भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
Web Title: Johnny, Ben turned the whole ‘game’; Lokesh Rahul's century in vain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.