नवी दिल्ली: जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख असणाऱ्या दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्सने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( बीसीसीआय) अर्ज केला आहे. दक्षिण अफ्रिका संघासाठी खेळत असताना ऱ्होड्स क्षेत्ररक्षक म्हणून खूप मोठे योगदान दिले होते. त्यानंतर त्याची जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख निर्माण झाली. तसेच इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी देखील महत्वाची भूमिका बजावली होती.
भारताचा नवा प्रशिक्षक कोण असेल याचा निर्णय कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समिती घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे आणि ही समिती मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. या समितीचे प्रमुख हे माजी कर्णधार कपिल देव असणार आहेत आणि त्यांच्यासह अंशुमन गायकवाड व शांथा रंगास्वामी हेही या समितीचे सदस्य आहेत. भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक 15 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका मालिकापूर्वी घोषित करण्यात येईल.
सध्या भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी आर श्रीधर आहेत. भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाणार असल्यामुळे त्यांचा कार्यकाळ 45 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे.